रस्त्यावरील खड्यांमध्ये केली रोवणी
By Admin | Updated: July 23, 2016 00:57 IST2016-07-23T00:57:44+5:302016-07-23T00:57:44+5:30
दोन वर्ष तरी रस्त्यावर इंचभरही खड्डा पडणार नाही, असा आत्मविश्वास रस्ता बांधकामाच्या वेळी अभियंत्यांनी दाखविला होता;

रस्त्यावरील खड्यांमध्ये केली रोवणी
पोलिसांचा बंदोबस्त : मुख्याधिकाऱ्यांनी घेतली दखल, प्रशासनाला जागविण्यासाठी नागरिकांची गांधीगिरी
इंद्रपाल कटकवार भंडारा
दोन वर्ष तरी रस्त्यावर इंचभरही खड्डा पडणार नाही, असा आत्मविश्वास रस्ता बांधकामाच्या वेळी अभियंत्यांनी दाखविला होता; मात्र अवघ्या सहा महिन्यात रस्त्यावर खड्डे पडले. राजीव गांधी चौक ते मुस्लिम लाय्रबरी चौकापर्यंतच्या मार्गावर असंख्य जीवघेणे खड्डे नागरिकांच्या जीवावर उठले. वारंवार सांगूनही डागडुजी होत नसल्याने संयमाचा बांध फुटलेल्या नागरिकांनी भर रस्त्यातील या खड्ड्यारुपी डबक्यांमध्ये धानाची रोवणी केली.
या अभिनव आंदोलनाची पोलिसांना भनक रात्रीच लागली होती. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या नेतृत्वात सकाळी ७ वाजतापासून राजीव गांधी चौक परिसरातील पोदार शाळेसमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. संतप्त झालेल्या नागरिकांनी सदर रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. सहा महिन्यात रस्ता उखळतो तरी कशा? बांधकामाच्या नावाखाली कंत्राटदारानी पैसा उकळला, परंतु गुणवत्तेवर भर दिला नाही, अश्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. सामान्य नागरिकांना या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
सहा महिन्यांपूर्वी रस्ता उखडायला लागला. हळूहळू खड्यांचे रुपांतर आता डबक्यात झाले. शहरातील मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या या रस्त्यावर जीवघेणे खड्डे असतांनाही नगर पालिका प्रशासन काहीच करत नाही. हा रस्ता नगर पालिकेच्या अख्यत्यारित येतो. रस्त्यावर धानाची रोवणी करुन प्रशासनाला जागविण्यासाठी हा उपक्रम करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.
लहान बालके या खड््यात पडून जखमी होत असतानाही पालिका प्रशासन डागडुजी करीत नाही. अल्पावधीत रस्त्याचे हाल झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या रस्त्यावर चुरी घालून रस्ता समानांतर करण्याचे कार्य सुरु होते.