रोवणी झाली, आता पाणी कुठून आणायचे?

By Admin | Updated: August 11, 2016 00:22 IST2016-08-11T00:22:20+5:302016-08-11T00:22:20+5:30

मागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीला कंटाळून शेतकरी शेती करीत आहे.

Rojna was done, where is the water? | रोवणी झाली, आता पाणी कुठून आणायचे?

रोवणी झाली, आता पाणी कुठून आणायचे?

भारनियमन बंद करा : शेतकऱ्यांचा राज्यकर्त्यांना सवाल
संजय साठवणे साकोली
मागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीला कंटाळून शेतकरी शेती करीत आहे. यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी परिस्थिती सुधारेल. मात्र शेतकऱ्यांच्या आशेवर कधी निसर्ग तर कधी शासन पाणी फेरते. पाऊस अत्यल्प बरसला. उशिरा का होईना शेतकऱ्यांनी जमेल तशी रोवणी पूर्ण केली. मात्र आता पुन्हा पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे धानाला लागणारे पाणी कसे आणायचे व १६ तासांच्या भारनियमनामुळे शेती कशी पिकवायची हा खरा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भारनियमन बंद करण्याचा एल्गार पुकारला आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्वत जुना तालुका म्हणून साकोली तालुक्याची नोंद आहे. मात्र राजकीय डावपेच व लोकप्रतिनिधींची उदासिनता यामुळे साकोली तालुका विकासाच्या बाबतीत मागे राहिला. याचे साधे उदाहरण म्हणजे तालुक्यातील तीन मोठे सिंचन प्रकल्प आजही अपुर्णावस्थेत आहेत. एकाही प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही. दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकात प्रकल्प पूर्ण करणाऱ्यासंदर्भात आश्वासनाची खैरात वाटली जाते. मात्र निवडून येताच या प्रकल्पाचा विसर पडतो. सद्यस्थितीला तिनही प्रकल्पात संपूर्ण तालुक्याची शेती पिकेल एवढे पाणी जमा झाले आहे. मात्र प्रकल्पाचे कामच अपूर्ण आहे. त्यामुळे हे पाणी ना तलावात सोडता येत ना शेतीला देता येत. ही तालुक्यातील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे.
यावर्षीही सुरुवातीपासूनच पाऊस मध्यम स्वरुपाचा येत आहे. त्यामुळे बरीच रोवणी उशिराने झाली. पावसाअभावी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
मात्र जसे जमेल तसे शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. कारण सिंचनाची अपुरी सोय तर दुसरीकडे ज्यांच्याजवळ विहिरी व बोअरवेल आहेत त्यांना भारनियमनाचा फटका. २४ तासातून फक्त ८ तास वीज प्रवाह सुरु राहतो व उर्वरीत १६ तासांचे भारनियमन. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी शेती पिकवायची तरी कशी हाही प्रश्नच आहे. या भारनियमनामुळे आताही साकोली तालुक्यात रोवणी सुरु आहे. उशिरा रोवणीमुळे नक्कीच उत्पन्नात फरक पडणार आहे.
१६ तासांचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात वीज वितरण कंपनीला निवेदन दिले होते. मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जि.प. सदस्य अशोक कापगते, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश ब्राम्हणकर, माजी सभापती मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, नरेंद्र वाडीभस्मे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. यावेळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी तीन दिवसात काहीतरी व्यवस्था करू असे आश्वासन दिले. मात्र अजूनपर्यंत तरी भारनियमनाचा बदल करण्यात आला नाही. त्यामुळे आताही कृषीपंपांना फक्त ८ तासच वीज पुरवठा मिळत आहे.

सिंचन प्रकल्प रखडलेले
रोवणी झाली. पावसाचा पत्ता नाही. आता शेतीसाठी पावसाची गरज आहे. सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. भारनियमनामुळे विहिरी व बोअरवेलचे पाणीही देता येत नाही. त्यामुळे शेतीला पाणाी आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
आश्वासनही फोल ठरले
शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या वेळी वीज वितरण कंपनीने भारनियमनात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता अजून झाली नाही.
शेतकऱ्याची आत्महत्या
सततच्या नापिकीला व यावर्षीची परिस्थिती पाहून पुन्हा याहीवर्षी नापिकीचा सामना करावा लागेल. या भीतीपायी सातलवाडा येथील शेतकरी हौसीलाल बिसेन यांनी याच महिन्यात विष घेऊन आत्महत्या केली. तरी शासनाला जाग आली नाही.

शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन तात्काळ भंडारा व मुंबई येथे पाठविण्यात आले. मात्र मुंबईवरून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भारनियमनासंबंधी कुठलाही नवा आदेश आले नाही. त्यामुळे १६ तासांचेच भारनियमन सुरु आहे.
- आर.के. घाटोळे, कार्यकारी अभियंता
ज्या विदर्भात सर्वात जास्त वीज तयार होते त्याच विदर्भात कृषीपंपाचे भारनियमन सुरु आहे. यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे शासन होते. त्यावेळी पावसाळ्यात कधीच भारनियमन करण्यात आले नाही. त्यामुळे हेच का अच्छे दिन असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करायची असेल तर शासनाचे तात्काळ भारनियमन बंद करून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे.
- सुनिल फुंडे, अध्यक्ष मध्यवर्ती बँक, भंडारा.

Web Title: Rojna was done, where is the water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.