चुल्हाड ( सिहोरा ) : गत वर्षभरापासून लॉकडाऊनची झळ सोसत असणाऱ्या रोहयो मजुरांना गावांत अपेक्षेत कामे मिळाले नाही. यामुळे मजूर आर्थिक कोंडीत सापडले आहेत. सिहोरा परिसरात मजुरांना पैशाची चणचण जाणवत असल्याने, रोहयो कामांना अटी व शर्तींच्या अधीन राहून मंजुरी देण्याची मागणी मजुरांनी केली आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर गेल्या वर्षांपासून लॉकडाऊन लागू करण्यात येत आहेत. यामुळे रोजगार बुडाला असून, कामे ठप्प पडले आहेत. ग्रामीण भागात रोजगाराचा वानवा असल्याने रोहयो मजूर अडचणीत आले आहेत. पावसाळ्यात कामे राहत नसल्याने, याच साठवणूक केलेल्या पैशावर मजुरांचे कुटुंब उदरनिर्वाह करीत आहेत. गावांत मजुरांना रोहयोअंतर्गत कामे उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतीनी नियोजन तयार केले नाही. याशिवाय शासन स्तरावरून मजुरांना कामे उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. गावात रोहयो कामे अटी व शर्तीच्या आधारावर सुरू करण्याची ओरड मजूर करीत आहेत. हाताला काम मिळण्यासाठी फक्त मे महिना असल्याने मजूर कासावीस झाले आहेत. सिहोरा परिसरात कामाचा अनुशेष शिल्लक आहे. महिनाभर मजुरांना कामे उपलब्ध होऊ शकतात, परंतु या दिशेने प्रयत्न करण्यात येत नाहीत.
बॉक्स
नदीला जोडणारे नाले तुंबले
सिहोरा परिसरात वैनगंगा, बावनथडी नद्यांना नाले जोडली आहेत. ही नाले केरकचरा, गाळ आदींनी तुंबले आहेत. यामुळे नद्यांना आलेल्या पुराचे पाणी गावात शिरल्यावर जलद गतीने विसर्ग होत नाही. यामुळे नाला सरळीकरण व खोलीकरणच्या कामांना रोहयोअंतर्गत मंजुरी देण्यात येत आहे, परंतु यंदा अशा कामाचे नियोजन नाही. यामुळे पावसाळ्यात पुराची भीती गावात आहे. एक संकट गेले की, दुसरे संकट गावकऱ्यांवर ‘आ’ वासून उभे आहे. गावातील मजुराकडे आता खायचे वांदे आले आहेत. रोजगार नसल्याने गावकरी भयभीत जीवन जगत आहेत.
बॉक्स
निधीअभावी ग्रामपंचायती हतबल
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. यामुळे नागरिक घरातच बंदिस्त होत आहेत. कोरोना संसर्गची साखळी तोडण्यासाठी नागरिक सहकार्य करीत असले, तरी त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. असे असले, तरी ग्रामपंचायत नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी निधी अभावी अडचणीत अडकल्या आहेत. गावात साधे फवारणी करण्यासाठी निधी नाही. रोजगार व पैशाची चणचण असल्याने सामान्य फंडात जमा होणारा कर प्रभावित झाला आहे.
कोट बॉक्स
●‘ग्रामीण भागात कोरोना विषाणू संक्रमित रुग्णाचे संख्येत वाढ झाली आहे. अनेक गल्लीतील लोक आजारी असल्याने रोहयो कामे सुरू करताना, शासनाला माथापची करावी लागणार आहे. मजुरांना आधार देण्यासाठी जॉब कार्डधारक मजुरांचे खात्यावर शासनाने तत्काळ सानुग्रह आर्थिक मदत दिली पाहिजे.’
- किशोर रांहगडाले, बिनाखी