रोहयो मजूरांना मिळतेय ‘मेजवानी’
By Admin | Updated: May 22, 2015 01:03 IST2015-05-22T01:03:22+5:302015-05-22T01:03:22+5:30
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामावर ऐरवी कुणी ढूंकून पाहत नाही, परंतु जनसंपर्कात नावावर येणाऱ्या निवडणुकीतील भावी उमेदवार मजूरांना ब्रेड पकोडा, .....

रोहयो मजूरांना मिळतेय ‘मेजवानी’
उमेदवारांचा नवीन फंडा : कामाच्या ठिकाणी ब्रेड पकोडा व थंड लस्सी
तुमसर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामावर ऐरवी कुणी ढूंकून पाहत नाही, परंतु जनसंपर्कात नावावर येणाऱ्या निवडणुकीतील भावी उमेदवार मजूरांना ब्रेड पकोडा, थंड लस्सी व बालुशाही सारखे मिस्टान्नांचे वाटप करीत आहेत. देव्हाडी जिल्हा परिषद क्षेत्रात राकाँ व भाजपच्या भावी उमेदवारांनी हा फंंडा अवलंबला आहे. आमदार व खासदारकीच्या निवडणुकीला लाजवेल असाच प्रकार येथे सुरू आहे.
सध्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे गावा गावात सुरू झाली आहेत. या कामावर गावातील मजूरांची संख्या मोठी आहे. सकाळी नऊ ते एक व सायंकाळी ३ ते ५ अशी वेळ कामाची असते. सध्या जि.प. पं.स. निवडणुकीचे वारे गावा गावात वाहू लागले आहे. देव्हाडी येथे सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर सुमारे २३० मजूर आहेत. दोन दिवसापूर्वी राकाँचे कार्यकर्ते व भावी जि.प. उमेदवार खेमराज पंचबुद्धे यांनी मजूरांना ब्रेड पकोडा व थंड लस्सीचे वाटप केले. मजुरांना अचानक मिळालेल्या मेजवानीने आश्चर्याचा धक्काच बसला.
एका महिला मजूराने सांगितले. भावी उमेदवार निवडणुकीत उभे होणार आहे. म्हणून ही मेजवानी दिली. एका महिन्यापुर्वी भाजपचे भावी उमेदवार भाऊलाल बांडेबुचे यांनी माडगी परिसरात बालुशाही मिस्टान्नचे वाटप केले होते. सदर प्रतिनिधीला याविषयी बातमी प्रसिद्ध करावी, अशी विनंती केली होती, हे विशेष.
यासंदर्भात खेमराज पंचबुद्धे यांना विचारले असता रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजूरांना ब्रेड पकोडा व लस्सी वितरीत केल्याचे सांगितले. देव्हाडीच नाही तर परिसरातील गावात रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजूरांना असे खाद्य पदार्थ गरीब मजूरांना वितरीत केल्याचे अभिमानाने सांगितले.
आमदार-खासदारकीच्या निवडणुकीला लागवेल असा प्रचार येथे सुरू आहे. रोजगार हमीची कामे विलंबाने सुरू होणे, मागील वर्षीची मजूरी मजूरांना मिळाली नाही. वीज व पाण्याची समस्याविषयी भावी उमेदवार अनभिज्ञ आहेत हे विशेष. येत्या महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असल्याने हा प्रकार झाला असल्याचे चौकाचौकात चर्चेचा विषय बनला आहे. (तालुका प्रतिनिधी)