रोहयोचे काम आता ७ वाजतापासून
By Admin | Updated: May 23, 2015 01:06 IST2015-05-23T01:06:35+5:302015-05-23T01:06:35+5:30
तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्या तापमानाचा प्रभाव काम करणाऱ्या मजूरांवर पडू नये यासाठी आता रोजगार हमी योजनेच्या कामाची वेळा बदलविण्यात आली.

रोहयोचे काम आता ७ वाजतापासून
मोहाडी : तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्या तापमानाचा प्रभाव काम करणाऱ्या मजूरांवर पडू नये यासाठी आता रोजगार हमी योजनेच्या कामाची वेळा बदलविण्यात आली. आता सकाळी ७ वाजता व दुपारी ३ वाजता मजुरांना कामावर जावे लागणार आहे.
सद्यस्थितील मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेचे काम सुरु आहेत. भर उन्हात काम सुरु असल्याने मजूरांच्या जिवाची लाहीलाही होते हे लक्षात घेवून मोहाडी पंचायत समितीचे उपसभापती उपेश बांते यांनी रोजगार हमी योजनेच्या कामाची वेळा बदलवून घेण्यासंबंधी आढावा बैठकीच्या पूर्वी सूचना केली होती. त्या सुचनेला अंतीम रुप देण्यात आले आहे. त्यामुळे आता सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५ वाजतापर्यंत उन्हात तापणारा मजूर कामावर सकाळी ७ वाजता कामावर जातील आणि ११ वाजता घरी परत येतील. त्यानंतर दुपारी ३ ते ६ वाजतापर्यंत काम करणार आहेत. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या वेळा बदलवून घेणारी मोहाडी पंचायत समिती जिल्ह्यात पहिली पंचायत समिती ठरली आहे. (तालुका प्रतिनिधी)
रोहयोच्या कामात गोंधळ
प्रत्येक मजुरांच्या हाताला काम मिळावे अशी शासनाची धारणा आहे. पण काम करुनही दाम मिळत नसल्याचा तक्रारी उजेडात येत आहेत. गुरुवारच्या दिवशी आंधळगाव या गावच्या मजूरांनी पंचायत समितीमध्ये हल्लाबोल केला. कामावर मजूरी कशी मिळणार याची शंका असणाऱ्या तीस-चाळीस मजूरांनी पंचायत समिती उपसभापती उपेश बांते यांच्या कक्षात धडक दिली. शासनाच्या नव्या निर्णयानुसार मजूरांना कामावर जाण्यासाठी व कामाची मागणी करण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूरांच्या आधारकार्डाची नोंदणी करणे सुरु आहे. यात आधारकार्डाची नोंदणी करणारे काळजी पुर्वक काम करीत नसल्याने मजूरांना कामावर जावूनही मजूरीपासून वंचित व्हावे लागत आहे. आंधळगाव येथील मजूर कामावर जावूनही त्याचे नाव यादीत नसल्याने न्यायासाठी भरउन्हात पंचायत समिती गाढले होते. अधिकारी तांत्रिक अडचण समोर करुन मजूरांची दिशाभूल करीत आहेत.
मजूर कामावर जावूनही त्यांच्या कामाचा हक्क व मजूरी यापासून दूर नेत आहेत. मोहाडी तालुक्यात असा गोंधळ सुरु असल्याने मजूरांना त्रास सहन करावे लागत आहे. रोजगार हमी योजनेच्या पंचायत समितीच्या विभागाची कार्यप्रणाली ठेपाळली आहे. मजूर कामावर गेला त्याला हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत. ही भूमिका व सहकार्याची भावना ठेवली जात नाही. कार्यालयाच्या तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करुन कामावर गेलेल्या मजुरांना रोजगार सेवक घराकडे हुसकावून लावण्याचे प्रमाण वाढले आहे. तांत्रिक अडचणी कार्यालयाच्या आहेत. मजूरांचा नाहीत. मजूरांनी केलेल्या कामाचा दाम मिळावा हीच अपेक्षा असते. पण तांत्रिक कारणमुळे आपणही हतबल आहोत असे बोलून कार्यालयीन अधिकारी आपले हात वर करीत आहेत. तथापि, उपसभापती उपेश बांते यांनी पुढाकार घेऊन त्या १८० मजूरांचे मस्टर काढले. त्यामुळे ते मजूर आजपासून पूर्ववत कामावर जाणार आहेत.