रोहयोवर गाजली मोहाडीची आमसभा
By Admin | Updated: February 28, 2015 00:49 IST2015-02-28T00:49:28+5:302015-02-28T00:49:28+5:30
पंचायत समिती मोहाडीची आमसभा रोजगार हमी योजना शालेय पोषण आहार मुद्यावर चांगलीच गाजली तर विहीरगाव येथील रोजगार सेवकाच्या नियुक्तीवरून चांगलाच गदारोळ झाला.

रोहयोवर गाजली मोहाडीची आमसभा
मोहाडी : पंचायत समिती मोहाडीची आमसभा रोजगार हमी योजना शालेय पोषण आहार मुद्यावर चांगलीच गाजली तर विहीरगाव येथील रोजगार सेवकाच्या नियुक्तीवरून चांगलाच गदारोळ झाला. उपस्थित सरपंच, उपसरपंचानी अधिकारी, कर्मचाऱ्यावर प्रश्नांचा भडीपार केला. यामुळे आमदार चरण वाघमारे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. आमसभा रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होती.
आमसभेला पंचायत समिती सभापती विणा झंझाड, उपसभापती उपेश बांते, तहसिलदार हरीभाऊ थोटे, गटविकास अधिकारी, दिलीप आगलावे, जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, रंजना उके, भोजराम पारधी, भाऊराव तुमसरे, केशव बांते, अनेक विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, तसेच सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
मोहाडी पंचायत समितीची आमसभा आमदार चरण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात अनेक सरपंच, उपसरपंचांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची मजुरी तालुका स्तरावरील डाटा आॅपरेटरच्या चुकीमुळे मिळाली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या विषयावर चांगलीच चर्चा रंगली. मजुरांचे बँक खाते क्रमांक चुकीचे घातल्याने एका गावातील मजुरांची मजुरी दुसऱ्याच गावच्या बँकेत जमा झाली तर काही मजुर कामावर गेले नसतानाही त्यांच्या बँक खात्यात मजुरी जमा झाल्याने ती त्यांनी काढून टाकली.
या घोटाळ्यामुळे रोहयोच्या अनेक मजुरांना अद्यापर्यंत मजुरी मिळालेली नाही. या विषयावर गटविकास अधिकारी, समन्वय अधिकारी यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. आमदार वाघमारे यांनी तालुका स्तरारील डाटा आॅपरेटरना कामात हयगय केल्याप्रकरणी बर्खास्त करावे, असा ठराव मांडला तर रोहयो अंतर्गत तयार करण्यात आलेला रस्ता एका शेतकऱ्याने जेसीबी लावून फोडला त्यावर एफआयआर दाखल करण्याचे सुचविण्यात आले. सालई खुर्द येथील कुशल कामाच्या निविदाच काढण्यात आल्या नाहीत. ग्रामसेवक गायधने यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनात आल्यावर आमदारांनी त्या ग्रामसेवकाला चांगलेच खडसावले तसेच त्यांच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निदेश दिलेत. शालेय पोषण आहारात अनेक शाळांना निकृष्ठ दर्ज्याचा धान्यपुरवठा केला जातो. करारानुसार उत्तम प्रकारचे धान्य पुरवठा करण्याचे निर्देश आहेत. मुख्याध्यापकांनी व शालेय समिती अध्यक्षांनी धान्य तपासूनच घ्यावे असे निर्देश दिले. (शहर प्रतिनिधी)