चौकशीच्या नावावर व्यापाऱ्यांची लूट
By Admin | Updated: October 22, 2015 00:35 IST2015-10-22T00:35:52+5:302015-10-22T00:35:52+5:30
धान्याची साठेबाजी तपासण्यासाठी जिल्ह्यातील किराणा दुकानांची जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाकडून तपासणी सुरू आहे.

चौकशीच्या नावावर व्यापाऱ्यांची लूट
पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव : परवाने काढण्याचे अधिकाऱ्यांचे निर्देश
भंडारा : धान्याची साठेबाजी तपासण्यासाठी जिल्ह्यातील किराणा दुकानांची जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाकडून तपासणी सुरू आहे. दरम्यान, मंगळवारला रात्री शहरातील मोठा बाजार चौकातील एका किराणा दुकानात भेट देऊन या पथकाने २० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
दरम्यान, याची माहिती आज बुधवारला अन्य किराणा व्यापाऱ्यांना होताच अनिल मलहोत्रा यांच्या नेतृत्वात शेकडो व्यापारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव करुन व्यापाऱ्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला.
यावेळी हे व्यापारी म्हणाले, मोठा बाजार चौकातील आशीर्वाद प्रोव्हीजन या दुकानात धान्याची तपासणी करायची आहे, असे सांगून तपासणी केली. यावेळी या पथकाला २० क्विंटल तूर डाळीची मर्यादा असताना या दुकानात तीन क्विंटल डाळ अधिक असल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने २० हजार रुपये दिले नाही तर कारवाई करु, अशी धमकी दिली. त्यामुळे आपण या पथकाला २० हजार रुपये दिले. आज बुधवारला याची माहिती अन्य व्यापाऱ्यांना दिल्यानंतर ते संतप्त झाले. त्यानंतर दुपारी १ वाजता या व्यापाऱ्यांंनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कार्यालय गाठले.
या भेटीत या व्यापाऱ्यांनी किराणा व्यापाऱ्यांच्या समस्या पुरवठा अधिकाऱ्यांना समजावून सांगितल्या. त्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी जो प्रकार तुमच्याशी घडला, त्याची तक्रार देण्याचे सांगितले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांना तक्रार दिली. यावेळी पुरवठा अधिकारी अनिल बनसोडे यांनी प्रत्येक व्यापाऱ्यांनी दुकानाचे परवाने काढून घ्यावे, अशा सूचना केल्या. त्या सुचनांचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले. परंतु पुरवठा विभागाकडून व्यापाऱ्यांना असे वेठीस धरणे चुकीचे असून जे पैसे या पथकाने घेऊन गेले ते परत करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)