आमगावातील रस्ते चिखलात
By Admin | Updated: July 18, 2016 01:30 IST2016-07-18T01:30:15+5:302016-07-18T01:30:15+5:30
आमगाव शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांची दरवर्षी दुरूस्ती व अपूर्ण बांधकामावर शासनाकडून

आमगावातील रस्ते चिखलात
नागरिकांना प्रचंड त्रास : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
आमगाव : आमगाव शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांची दरवर्षी दुरूस्ती व अपूर्ण बांधकामावर शासनाकडून निधी खर्च करण्यात येतो;परंतु नियोजनबध्द व कामावरील अनियमिततेमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मागील वर्षी बांधकाम झालेले डांबरीकरण रस्ते खड्यात व चिखलमय झाले आहे. या रस्त्यावरील मार्गक्रम करतांना नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे.
आमगाव ग्रामीण भागातील आमगाव पाऊलदौना, तिगाव, मुंडीपार, सुपलीपार, कातुर्ली, शिवनी, जवरी, सावंगी या मार्गावरील डांबरीकरण रस्ते दुरूस्ती व बांधकाम करण्यात आले. परंतु योग्य नियोजनाअभावी या रस्त्यांची वाताहात झाली आहे. रस्त्यावरील खड्डे पडले. त्याते पाणी साचल्याने मार्गक्रम करणाऱ्यांसाठी हे खड्डे धोक्याची घंटा वाजवित आहेत.
आमगाव, मुंडीपार, कट्टीपार व कालीमाटी या मार्गावरील रस्त्यांची वाताहात आहे. कालीमाटील घाटटेमनी, भोसा, कातुर्ली मार्ग डांबरीकरण रस्त्याअभावी खड्यात रुपांतर झाले आहे. जामखारी, तिगाव, पाऊलदौना, कुंभारटोली या गावातील मुख्य मार्ग डांबरीकरण रस्त्यांच्या दैनावस्थेमुळे चिखलमय झाले. एक ते दीड फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत. तीच अवस्था किंडगीपार, जवरी व शिवनी मार्गावर दिसत आहे. परंतु संबंधीत विभागाने दखल घेतली नाही. या मार्गावरील नियोजनबध्द बांधकामाला लोकप्रतिनिधींनीच पाठ फिरविल्याने यापूर्वी झालेल्या बांधकामावरील निधी पाण्यात गेला. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात २०१४-१५ व २०१५-१६ या आर्थिक वर्षात डांबरीकरण रस्ते बांधकाम व दुरूस्ती करण्यात आली. या बांधकामावर निधीचा खर्च करण्यात आला. परंतु बांधकाम नियोजनबध्द व योग्य बांधकामाअभावी सदर रस्ते पुन्हा पावसाळ्यात वर्ष लोटण्याआधी खड्यात रुपांतरीत झाले. आमगाव शहरातील मुख्य रस्ते दरवर्षी बांधकाम व दुरुस्ती करूनही खड्यात का रुपांतरीत होतात हा संशोधनाचा विषय नागरिकांसाठी आहे. नगरातील गांधी मार्ग ते नटराज मार्ग, बाजार समिती मार्ग, कामठा चौक मार्ग, लांजी मार्ग, पंचायत समिती मार्ग, किडंगीपार बायपास मार्ग, आंबेडकर मार्ग ते कुंभारटोली मार्गावरील दरवर्षी दुरूस्ती व बांधकाम झाल्यावरही या रस्त्यांची दैनावस्था कायम आहे. संबंधित विभागातील अधिकारी व कंत्राटदार यांच्या अनियमिततेमुळे बांधकाम निकृष्टपणे करण्यात येत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची वाताहत झाली आहे. रस्त्यांवर मार्गक्रमन करण्यासाठी नागरिकांना पायी चालणे कठीण झाले आहे. या निकृष्ट रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनामुळे नागरिकांना अपघातांना समोर व्हावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)