रस्ते ठरताहेत जीवघेणे
By Admin | Updated: February 23, 2015 01:08 IST2015-02-23T01:08:56+5:302015-02-23T01:08:56+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मोठमोठे खड्डे आणि उखडलेल्या गिट्टीमुळे ...

रस्ते ठरताहेत जीवघेणे
भंडारा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मोठमोठे खड्डे आणि उखडलेल्या गिट्टीमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागते.
यामुळे वाहनाला अपघात होण्याचे प्रकार वाढले आहे. शिवाय हाती घेण्यात आलेली रस्त्याची पिचिंगची कामेही निकृष्ट होत आहे. मंजूर झालेल्या काही कामांनाही अजून मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे आणखी किती दिवस खड्डामय रस्त्यांमधून मार्ग काढायचा, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शहराचा काही भाग सोडला तर जिल्ह्याच्या बहुतांश भागातील परिस्थिती सारखीच आहे. जागोजागी तीन ते चार फूट रुंद आणि अर्धा फूट खोलपर्यंत खड्डे पडलेले आहेत. अशा रस्त्यांवरून मोठी वाहने तर दूर दुचाकींनाही मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. एसटी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची ग्रामीण भागातील रस्त्यावर सतत वर्दळ असते. मात्र प्रत्येक ठिकाणी उसळणाऱ्या वाहनामुळे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी गावापासून काही अंतरावर असलेल्या शाळांमध्ये सायकलीने जातात. मार्गात असलेल्या मोठ्या वाहनांना मार्ग देण्याच्या प्रयत्नात त्यांना रस्त्याखाली उतरावे लागते.
रस्त्याच्या दोन्ही बाजू वाहतुकीयोग्य राहिलेल्या नाही. अनेक ठिकाणी तर रस्ता समतल करण्याचेही सौजन्य दाखविले गेले नाही. एकाच वेळी दोन वाहने मार्गात असल्यास बाजू देण्याच्या प्रयत्नात ते मुख्य रस्त्याच्या खाली उतरतात. यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
अलिकडे काही ठिकाणी रस्त्याच्या डागडूजीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर कामही थातूरमातूर होत आहे. केवळ मोठे खड्डे बुजविण्यात येत आहे. यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. संबंधित विभागाने या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (नगर प्रतिनिधी)