जेसीबीने फोडला रस्ता
By Admin | Updated: December 30, 2016 01:42 IST2016-12-30T01:42:45+5:302016-12-30T01:42:45+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाखो रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आला. एका इसमाने

जेसीबीने फोडला रस्ता
आंबागड येथील प्रकार : अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
तुमसर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाखो रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आला. एका इसमाने हा रस्ता जेसीबीने फोडला. या प्रकरणाची लेखी तक्रार ग्रामस्थांनी खंडविकास अधिकाऱ्यांना केली. परंतु अजूनपर्यंत चौकशी झाली नाही. अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मौजा आंबागड येथे सन २०१३-१४ या वर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद तितीरमारे ते रणधीर पटले यांच्या शेतीपर्यंत पांदन रस्त्याचे माती व मुरुम कामे करण्यात आली होती. लाखो रुपये या रस्त्यावर खर्च करण्यात आले. रस्ता फोडल्याने सुमारे ५० ते ६० शेतकऱ्यांना शेतीवर जाता येत नाही. एका इसमाने जेसीबी मशीनने रस्ता फोडला. तिथे शेत तयार केले. रस्त्याची माती लगतच्या बोडीत टाकली. उर्वरीत माती मुरुम दुसरा रस्ता तयार करण्याकरिता वापरात आणली. गट ग्रामपंचायतच्या आंबागड येथील पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. आंबागडच्या तलाठी व्ही.डी. टांगले, कोतवाल अजय कावळे यांनी मोका चौकशी करून पंचनामा तयार केला. पंचनामा तयार करतेवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारीसह कर्मचारी उपस्थित होते. रस्त्याची जागा महसूल जिल्हा परिषद व वनविभागाअंतर्गत येत आहे. सुमारे ३० जणांनी स्वाक्षरीनिशी खंडविकास अधिकाऱ्यांना या प्रकरणाची लेखी तक्रार दिली. परंतु आजपावेतो या तक्रारीची साधी दखल घेण्यात आली नाही. शासनाचे लाखो रुपये रस्त्यावर खर्च झाले. संबंधित इसमावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. (तालुका प्रतिनिधी)