५०० मीटरच्या रस्त्यावर आहेत खड्डेच खड्डे
By Admin | Updated: May 17, 2015 01:17 IST2015-05-17T01:17:25+5:302015-05-17T01:17:25+5:30
करडी ते खडकी मार्गावरून मुंढरी खुर्द गावात पोहचणाऱ्या रस्त्याची पार अवस्था झाली आहे.

५०० मीटरच्या रस्त्यावर आहेत खड्डेच खड्डे
करडी/पालोरा : करडी ते खडकी मार्गावरून मुंढरी खुर्द गावात पोहचणाऱ्या रस्त्याची पार अवस्था झाली आहे. देव्हाडा ते साकोली राज्य मार्गावरून करडी बसस्टॅन्ड पर्यंत पोहचणारा मार्ग दाबल्या गेला असून रस्त्याच्या दुरूस्तीकडे जि.प. बांधकाम उपविभाग मोहाडी यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे दोन्ही गावातील नागरिक त्रस्त आहेत.
मुख्य मार्गावरून मुंढरी खुर्द गावात पोहचण्यासाठी ५०० मीटर लांबीचा डांबरीकरण रस्ता आज मातीमोल झालेला आहे. रस्त्याच्या मधोमध कुठे खोलगट भाग तर कुठे उंचवटा तयार झाला आहे. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ग्रामवासीयांनी लोकप्रतीनिधींना अनेकदा साकडे घातले. मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. तीन वर्षांअगोदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. रस्त्यावरील डांबरच आज अस्तित्व शोधत आहे. याला रस्ता म्हणावे की काय हेच समजण्यापलीकडे आहे.
मुंढरी बुज फाट्यावरून करडी गावात बस स्टॅन्ड पर्यंत पोहचण्यासाठी दीड दोन वर्षापुर्वी डांबरीकरण रस्ता तयार केला गेला. रस्त्यासंबंधी कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी पाहिजे तशी काळजी घेतली नाही. दोन वर्षातच रस्ता पूर्णत: दाबल्या गेला. खोल खड्ड्यांनी आतील माती वर डोकावत आहे. लोकप्रतीनिधीने ढोल वाजवित श्रेय लाटण्याचाही प्रयत्न केला होता. आज तेच लोकप्रतिनिधी रस्त्या संबंधी बोलायला तयार नाहीत. नागरिकांनी विचारणा करताच कान व तोंड बंद करून बाजूला पळतात.दोन्ही रस्त्यावर कोणत्याही प्रकारची अवजड वाहतूक नसताना रस्त्याची दुरावस्था झाली असून विभागही बांधकामाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. नागरिक विचारतात, केव्हा येणार अच्छे दिन, अच्छे दिन मात्र अधिकारी व कंत्राटदारांचे आले, असेच नागरिकांना वाटत आहे. (वार्ताहर)