नदीघाट लिलाव आष्टीचा रेती उत्खनन दुसऱ्याच स्थळातून
By Admin | Updated: October 11, 2014 01:17 IST2014-10-11T01:17:28+5:302014-10-11T01:17:28+5:30
तुमसर तालुक्यातील पाथरी गावाबाहेर रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. नदीपात्रातून रेती उपस्याची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत होती.

नदीघाट लिलाव आष्टीचा रेती उत्खनन दुसऱ्याच स्थळातून
तुमसर : तुमसर तालुक्यातील पाथरी गावाबाहेर रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. नदीपात्रातून रेती उपस्याची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत होती. तत्पूर्वी रेती कंत्राटदारांनी डम्पिंग यार्ड तयार केले. आष्टी नदीघाटाचा लिलाव झाला होता. परंतु ग्रामस्थांनी विरोध केल्याने कंत्राटदारांनी मोर्चा पाथरीकडे वळविला आहे.
तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर आष्टी हे गाव आहे. गावाशेजारून बावनथडी नदी आहे. महसूल प्रशासनाने आष्टी नदीघाटाचा लिलाव केला होता. सुरुवातीला रेतीचे ट्रक गावातून सर्रास जात होते, पुढे गावकऱ्यांनी या ट्रकना रेती नेण्यासाठी मनाई केली. कंत्राटदाराने त्यानंतर दुसरीकडून रेतीचा उपसा करणे सुरु केले. पाथरी या गावाकडे आपला मोर्चा वळविला.
नदी घाटातून रेती उत्खनन करण्याची परवानगी ३० सप्टेंबरपर्यंत होती. मुदत संपण्याची वेळ जवळ आली तसे कंत्राटदाराने पाथरी गावाबाहेर तलाठी कार्यालयाच्या मागे रेतीचे डम्पिंग यार्डच तयार केले. २४ तास येथे रेतीचा उपस्या सुरु होती अशी माहिती आहे. यासंदर्भात तलाठी देशभ्रतार यांना विचारले असता मी निवडणूक कामात व्यस्त आहे, असे सांगून तहसीलदारांकडून अधिक माहिती घ्या, असे बोलले.
यासंदर्भात ग्रामवासीयांशी संवाद साधला असता अनेकदा याची तक्रार केल्यावर प्रशासनाने कारवाई केली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आष्टी येथे नदीघाट नियमानुसार लिलाव झाले असताना दुसरीकडून रेती उत्खनन कसे केले. लिलावापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी लागते. आष्टी ग्रामपंचायतीने रितसर परवानगी दिली. मग त्यांना मज्जाव कसे करण्यात आले. रेती नदीपात्रातून दुसरीकडून कशी काढण्यात आली. सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)