ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा धोका वाढला; 700 गावांना कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:53+5:302021-04-23T04:37:53+5:30

भंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा ग्रामीण भागाला बसला असून गावागावांत आणि घराघरांत कोरोनाचे रुग्ण आहेत. जिल्ह्यातील काही मोजकी ...

The risk of corona increased in rural areas; Corona to 700 villages | ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा धोका वाढला; 700 गावांना कोरोनाचा विळखा

ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा धोका वाढला; 700 गावांना कोरोनाचा विळखा

भंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा ग्रामीण भागाला बसला असून गावागावांत आणि घराघरांत कोरोनाचे रुग्ण आहेत. जिल्ह्यातील काही मोजकी गावे सोडली तर तब्बल ७०२ गावांमध्ये सद्य:स्थितीत कोरोना रुग्ण आहेत. पुरेशा सुविधांअभावी ग्रामीण जनता भयभीत झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण शहरी भागात आढळून येत होते. त्यामुळे ग्रामीण भागात निश्चिंत होता; परंतु अलीकडे शहरांपेक्षा ग्रामीण भागातच रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. भंडारा तालुक्यातील १५८ गावांपैकी तब्बल १५६ गावांमध्ये सद्य:स्थितीत कोरोनाचे रुग्ण आहेत. मोहाडी तालुक्यातील ९९ गावांपैकी ९२ गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तुमसर तालुक्यातील १३४, पवनी तालुक्यातील १३३, लाखनी तालुक्यातील ९४, साकोली तालुक्यातील ९६ आणि लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. ग्रामीण भागात आधीच आरोग्य सुविधांचा अभाव आहे. त्यात रुग्णसंख्या वाढत आहे. ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना भंडारा या जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. आरोग्य यंत्रणा रुग्णांना सुविधा देण्यास तोकडी पडत असल्याचे सध्या चित्र आहे. अनेक रुग्णांचे नातेवाईक बेडसाठी भटकंती करीत असल्याचे दिसून येते. बेड मिळाला तर ऑक्सिजन नाही आणि ऑक्सिजन मिळाला तर इंजेक्शन नाही, अशी स्थिती आहे.

ऑक्सिजनसाठी लागतात रांगा

गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते. मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर येथे तर ऑक्सिजन बेडची सुविधाच नाही. त्यामुळे लाखांदूरच्या रुग्णाला पवनी किंवा साकोलीकडे धाव घ्यावी लागते. मोहाडीतील रुग्ण थेट भंडारा गाठतात. लाखनी येथे असलेले १० सिलिंडर भंडारा येथे नेण्यात आले. त्यामुळे लाखनी येथे ऑक्सिजनची सुविधा नाही.

ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी ऑक्सिजनअभावी कुणाचाही जिल्ह्यात मृत्यू झाल्याची नोंद नाही. अत्यवस्थ रुग्णांना शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला जातो. जिल्ह्यात ६२० ऑक्सिजन बेड असून त्यात शासकीय रुग्णालयांमध्ये २५५ आणि खासगी रुग्णालयात ३६५ बेडचा समावेश आहे. तर १३० व्हेंटिलेटर आहेत. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा केला जातो. पुरेसा ऑक्सिजन साठा मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला साकडे घातले असून लवकरच वाढीव ऑक्सिजन सिलिंडर साठा उपलब्ध होणार आहे.

लाखनी, लाखांदूर, मोहाडीत ऑक्सिजन बेड नाही

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत असला तरी सातपैकी तीन तालुक्यांत ऑक्सिजन बेडची सुविधा नाही. मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर येथे ऑक्सिजन बेडची सुविधा नाही. मोहाडी येथे तर साधे कोविड केअर सेंटरही नाही. त्यामुळे या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागते.

Web Title: The risk of corona increased in rural areas; Corona to 700 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.