तांदळाचे भाव गडगडले गिरणी मालक अडचणीत
By Admin | Updated: January 7, 2016 00:59 IST2016-01-07T00:59:52+5:302016-01-07T00:59:52+5:30
खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात धानाचे उत्पादन झाले. तरी भाव गडगडत आहेत.

तांदळाचे भाव गडगडले गिरणी मालक अडचणीत
कोंढा (कोसरा) : खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात धानाचे उत्पादन झाले. तरी भाव गडगडत आहेत. याला केंद्र व राज्य शासनाचे धोरण कारणीभूत आहे. अशी धान उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता तयार झाली आहे. धानाला योग्य भाव नसल्याने अनेक राईस मिलमध्ये भात भरडण्याकडे शेतकरी डोळेझाक करीत आहे. यामुळे गिरणीमालक देखील संकटात सापडले आहे.
पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. सतत तीन वर्षापासून दुष्काळ, अतिवृष्टी किडीचा प्रादुर्भाव अशा संकटात सापडत आहे. त्यामुळे धानाचे उत्पादनात घट होत आहे. यावर्षी तर एकरी १० ते १५ पोते धान झाले. धानाला योग्य भाव नाही. अनके गिरणीमालक धान खरेदी करतात व धानाचे मिलिंग करून तांदूळ बनवून मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. काही व्यापारी धानाची खरेदी करून मिलिंग करून तांदूळ बनवून विकत असतात. ठोकळ प्रतीचे धान आधारभूत केंद्रावर विकतात. पण बारीक पोते असलेले धान सध्या २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल व्यापारी घेत आहेत. त्याचे तांदूळ बनवितात. पण तांदळाला उठाव नसल्याने तांदूळ गिरणीमध्ये तुंबून आहे. भाव कमी असल्याने शेतकरी धान घरी भरून ठेवतात. तर काही शेतकरी गिरणीच्या बाहेर धानाच्या पोत्याच्या थप्प्या लावून ठेवत आहेत. भंडारा जिल्ह्यात पवनी, भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखांदूर तालुक्यात धानाचे उत्पादन भरमसाठ आहे. (वार्ताहर)