तांदळाचे दर घसरले
By Admin | Updated: December 27, 2015 00:51 IST2015-12-27T00:51:59+5:302015-12-27T00:51:59+5:30
केंद्र सरकारने हरितक्रांती करीत तंत्रज्ञानाने शेती करण्याचे आवाहन केले. खर्चाची मर्यादा कमाल करून आयात बंद करून निर्यात काही काळ सुरु केली.

तांदळाचे दर घसरले
पालांदूर : केंद्र सरकारने हरितक्रांती करीत तंत्रज्ञानाने शेती करण्याचे आवाहन केले. खर्चाची मर्यादा कमाल करून आयात बंद करून निर्यात काही काळ सुरु केली. परंतु मागील वर्षापासून निर्यात थांबल्याने फाईन धान, तांदळाला योग्य बाजारपेठ नसल्याने धान, तांदळाचे दर घसरले असून चांगल्या धानाची शेती संकटात आली आहे.
भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व अर्धा नागपूर जिल्ह्यात धान पिक घेत जाड व फाईन धान पिकविले जाते. सिंचीत शेतीत फाईन धान पिकविले जाते. तर कोरडवाहू शेतीत जाड धानाला कमी खर्चामुळे प्राधान्य दिले जाते. प्रक्रियेला उद्योगात जाड धानावर प्रक्रिया करून पोहे, मुरमुरा, चिवडी तयार केली जाते. महाराष्ट्रात प्रक्रिया उद्योग अत्यल्प असल्याने जाड धानाला भाव नाही. पालांदूर जवळील पाथरी, मऱ्हेगाव, लोहारा, नरव्हा, खराशी, खुनारी आदी गावातून व्यापाऱ्यांच्या मदतीने रोजच जाड धानाचे ट्रक आंध्रप्रदेशात जात असल्याचे कळले. नेट बँकेच्या सुविधेमुळे व्यवहार होत असून खासगी व्यापारी मालामाल होत असून शेतकरी मात्र जिथल्या तिथेच आहे.
बारीक धानात जय श्रीराम, एचएमटी, आरपीएन ला मान्यता असून यांचा एकरी उत्पन्न जाड धान्याच्या निम्मेच असते. आज जयश्रीराम धान २००० रुपये तर तांदूळ ३३०० ते ३५०० रुपये पर्यंत मागील वर्षाला याच धानाला २८०० - ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव असून ४५०० - ४८०० रुपये दराने तांदूळ विकल्या गेला. भंडाऱ्यातील तांदूळ महोत्सवातही चांगली मागणी होती. यात शेतकरी ग्राहक असा थेट व्यवहारामुळे व्यवहार पारदर्शक घडतो. हाच तांदूळ मुंबई दिल्लीला १०० ते १२० रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. (वार्ताहर)