जलशुद्धीकरण केंद्राचे पुनरुज्जीवन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 00:19 IST2017-05-07T00:19:56+5:302017-05-07T00:19:56+5:30

राज्यातील ग्रामीण भागातील दिर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करुन ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी....

The revival of the water purification center | जलशुद्धीकरण केंद्राचे पुनरुज्जीवन होणार

जलशुद्धीकरण केंद्राचे पुनरुज्जीवन होणार

गणेशपूरला ५७ लाखांचा निधी मंजूर : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे अर्थसहाय्य, नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातील ग्रामीण भागातील दिर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करुन ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतून गणेशपूर ग्रामपंचायतच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी ५६ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून येत्या काही दिवसातच गणेशपूरवासीयांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे.
वैनगंगा नदीचे दूषित पाणी नागरिकांना नळाद्वारे पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने बाजू लावून धरली होती. १७ एप्रिलच्या अंकात ‘दोन लाख नागरिकांच्या हातात विषाचा प्याला’ या आशयाचे वृत्त प्रकाशित होताच, याची दखल घेत जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याचा पाठपुरावा केला. याबाबत मुंबई येथे १८ एप्रिलला तातडीची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत गणेशपूर येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने ५६ लाख ८१ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला.
याबाबत राज्यशासनाने ३ मे ला अधिसूचना जारी केली आहे. यामुळे येत्या कालावधीत मागील काही वर्षांपासून रखडलेले गणेशपूर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम आता मार्गी लागणार आहे. या कामासाठी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, ग्रामपंचायत गणेशपूर, पाणीपुरवठा विभाग भंडारा यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याची फलश्रृती शासनाने गणेशपूर येथील जलशुध्दीकरण केंद्राला निधी देवून नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रशासनाच्या कार्यतत्परतेवर केंद्राचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

जि.प. कडे राहणार अधिकार
पाणीपुरवठ्याच्या योजना यापुर्वी ग्रामपंचायतच्या अधिकारात राहत होत्या. मात्र त्यांच्याकडून योग्य अंमलबजावणी होत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनात आली. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची अंमलबजावणी योग्यरीत्या व्हावी यासाठी आता या योजनांचे अधिकार जिल्हा परिषद प्रशासनाकडे राहणार आहे.

जि.प. सभेत उचलला मुद्दा
गणेशपूर येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने स्वजलधारा, महाजनधारा अंतर्गत पाणीपूरवठ्याची योजना तयार केली. त्या योजनेचे २० टक्के काम शिल्लक असून ते पूर्ण करण्यासाठी निधी देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी जि.प. सर्व साधारण सभेत लावुन धरली होती. यानंतर जलशुद्धीकरण योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्याबाबत पाहणी करुन अंदाजपत्रक तयार करण्यात आले. यानुसार प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याअनुषंगाने हा निधी उपलब्ध झाला आहे.
ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाचा पाठपुरावा
गणेशपूर ग्रामवासीयांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जलशुध्दीकरण यंत्राचे रखडलेले काम पुर्ण करण्यासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी गणेशपूर ग्रामपंचायतीने अनेकदा शासनाकडे लावून धरली. या अनुषंगाने जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने ही याचा सतत पाठपुरावा केल्याने हा निधी उपलब्ध झाला आहे.

नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. या अनुषंगाने सर्वांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला. प्रशासनाने याची दखल घेवून निधी उपलब्ध करुन दिला. येत्या कालावधीत जलशुध्दीकरण यंत्राचे रखडलेले काम पूर्ण होवून नागरिकांना शुध्द पिण्यासाठी पाणी मिळेल.
- जया सोनकुसरे,
जिल्हा परिषद सदस्य, भंडारा

Web Title: The revival of the water purification center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.