प्रधान सचिवांनी घेतला व्याघ्र प्रकल्पाचा आढावा
By Admin | Updated: May 11, 2014 23:10 IST2014-05-11T23:10:56+5:302014-05-11T23:10:56+5:30
जिल्ह्यात नव्यानेच निर्माण झालेल्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीणकुमार परदेशी यांनी शनिवारी कोका, नागझिरा येथे भेट दिली.

प्रधान सचिवांनी घेतला व्याघ्र प्रकल्पाचा आढावा
भंडारा : जिल्ह्यात नव्यानेच निर्माण झालेल्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीणकुमार परदेशी यांनी शनिवारी कोका, नागझिरा येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी विविध विषयांचा आढावा घेऊन अधिकार्यांना निर्देश दिले. प्रधान सचिव परदेशी यांचा हा दौरा अत्यंत गुप्त होता. शनिवारी त्यांनी कोका अभयारण्य, नागझिरा व न्यु नागझिरा येथील वन्यप्राण्यांबाबत माहिती जाणून घेतली. त्यांच्यासोबत वन्यजीव विभागाने वरिष्ठ अधिकारी, गोंदिया व भंडारा वन विभागाचे अधिकारी होते. मागील काही दिवसांमध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीत झालेली वाढ लक्षात घेता त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. वाघांची संख्या वाढविण्यासाठी तसेच वाघांचे संवर्धन करण्यासाठी कोका, नागझिरा व न्यू नागझिरा अभयारण्य मिळून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. त्यादृष्टीने वाघांच्या संवर्धनासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याची माहिती त्यांनी घेतली. याशिवाय जंगलातील वनतलाव, पानवठे याचीही पाहणी केली. कोका अभयारण्य निर्माण होण्यासाठी प्रवीण परदेशी यांची भूमिका मोठी होती. या व्याघ्र प्रकल्पाच्या भरभराटीसाठी सामूहिक प्रयत्न करावे, वन्यजीवांच्या संवर्धनाची विशेष खबरदारी घ्यावी, असे निर्देश परदेशी यांनी अधिकार्यांना दिले. (प्रतिनिधी)