मुख्य सचिवांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा

By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-11T01:38:59+5:302015-07-11T01:38:59+5:30

राज्यात पावसाने मारलेली दडी आणि खोळबंलेल्या पेरणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज शुक्रवारला ...

Review of the peak situation taken by the Chief Secretaries | मुख्य सचिवांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा

मुख्य सचिवांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा

भंडारा : राज्यात पावसाने मारलेली दडी आणि खोळबंलेल्या पेरणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज शुक्रवारला राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पीक परिस्थितीचा आढावा घेतला.
राज्यात मराठवाडा विभागात अजूनही फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. याचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला त्याचबरोबर जिल्ह्याातील बियाण्यांची व खतांची उपलब्धता व मागणी याची माहिती त्यांनी जाणून घेतली.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. शेतकऱ्यांचे धान नर्सरी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र आज सकाळपासून जिल्हयात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात ९० टक्के भात नर्सरी झाली असून तुरीची ७३ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात बियाण्यांची व खताची कमतरता नाही, असे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले.
जिल्ह्यात किसान पोर्टलवर २९ हजार ५३६ शेतकऱ्यांनी नोंदणी झालेली आहे. या पोर्टलमार्फत शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, पीक परिस्थती, किड व रोगांची माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
१५ दिवसानंतर पावसाची हजेरी
पवनी : तालुक्यात मागील १५ दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. शेतकऱ्यांचे पऱ्हे वाळलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. चौरास भागात ज्या भागात सिंचनाची सोय आहे, अशा भागात २० टक्के रोवणी आटोपलेली आहे. मात्र कोरडवाहू भागात पऱ्हे पाण्याच्या प्रतिक्षेत सुकत आहेत. काल रात्री पावसाने एकाएकी जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ज्या भागात सिंचनाद्वारे रोवणी झाली आहे. ती रोवणीसुध्दा संकटात सापडली आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल गेल्यामुळे रोवणीला पाणी पुरविणे कठिण झाले होते. आणखी एक आठवडा पाऊस आला नसता तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असती.
पवनी तालुक्यातील या भागात मोठ्या प्रमाणात धानपिकाची शेती केली जाते. धानपिकाला पाण्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते. कोरडवाहू भागात पऱ्हे वाचविण्याकरिता शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा दुष्काळ तर पडणार नाही ना! या चिंतेने शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र गुरुवारला रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे उद्यापासून पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.

Web Title: Review of the peak situation taken by the Chief Secretaries