महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जिल्हाव्यापी लेखणीबंद आंदोलन
By Admin | Updated: August 29, 2015 00:57 IST2015-08-29T00:57:40+5:302015-08-29T00:57:40+5:30
पवनी तहसील कार्यालयात दोन इसमांनी घातलेला धिंगाणा व भंडारा नगरपालिका कर्मचाऱ्याला मारहाण आणि ...

महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जिल्हाव्यापी लेखणीबंद आंदोलन
भंंडारा : पवनी तहसील कार्यालयात दोन इसमांनी घातलेला धिंगाणा व भंडारा नगरपालिका कर्मचाऱ्याला मारहाण आणि त्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यात झालेल्या खडाजंगीनंतर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला लढा अजून तिव्र केला आहे. कालपासून सुरु झालेले लेखणीबंद आंदोलन आजही कायम होते.
दरम्यान महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना निवेदन देत पवनी येथे घडलेल्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी यांनी जाहिर माफी मागावी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत शासनाने तरतूद करावी, या मागणीचे निवेदन दिले आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आंदोलनामुळे सामान्य नागरिकांची प्रचंड गोची झाली आहे. विविध कामांसाठी जिल्ह्याभरातून जिल्हा मुख्यालयात आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भांडणात जनसामान्यांची कामे रेंगाळत आहेत.
तहसील कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. ३० आॅगस्टपर्यंत कार्यालयात हजर राहून लेखणीबंद आंदोलन करणे, दुपारसत्रात तालुका स्तरावर व जिल्हाधिकारी कार्यालयात, घोषणा देणे, ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत घोषणा, निदर्शने, धरणे देणे तर ३ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन पुकारण्याचा पवित्रा महसूल कर्मचारी संघटनेने घेतला आहे. भंडारासह लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, मोहाडी व तुमसर येथे ही महसूल अधिकाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. (प्रतिनिधी)