अवैध गौण खनिजातून मिळाला १.९ कोटींचा महसूल

By Admin | Updated: March 28, 2015 00:25 IST2015-03-28T00:25:36+5:302015-03-28T00:25:36+5:30

‘रेती’ या गौण खनिजाचे भंडारा जिल्ह्याला वरदान लाभले आहे.

Revenue from illegal minor minerals fetched 1.9 crores | अवैध गौण खनिजातून मिळाला १.९ कोटींचा महसूल

अवैध गौण खनिजातून मिळाला १.९ कोटींचा महसूल


इंद्रपाल कटकवार  भंडारा
‘रेती’ या गौण खनिजाचे भंडारा जिल्ह्याला वरदान लाभले आहे. परंतु या रेतीची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या तस्करी सुरू आहे. काही ठिकाणी चोरीछुपे तर काही ठिकाणी खुलेआम हा प्रकार सुरू आहे. जिल्हा खनिकर्म विभाग, तहसील कार्यालय व पोलीस प्रशासनाने मागील ११ महिन्यात अवैधरित्या या गौण खनिजांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून एक कोटी ९ लाख रूपयांचा महसुल गोळा केला आहे.
जीवनदायिनी असलेली ‘वैनगंगा नदी’ ही भंडारा जिल्ह्यासाठी वैभव आहे. या नदीतून ‘ए वन’ दर्जाची वाळू वैनगंगेच्या विशाल नदीपात्रात आढळते. येथील रेतीला नागपूरसारख्या महानगरात मोठी मागणी आहे. यामुळे या रेतीची अवैध तस्करीही मोठ्या प्रमाणात होत असते.
जिल्ह्यातील नदी घाटांचे लिलाव झाले किंवा नाही याचा कुठलाही परिणाम रेतीच्या अवैध वाहतुकीला जाणवत नाही. न्यायालयाच्या बंदीनंतर जिल्ह्यातील विविध नदी घाटातून रेतीची दिवसरात्र वाहतुक सुरूच असते. या कारवायांवर अंकुश लावण्यासाठी तहसील प्रशासन, जिल्हा खनिकर्म विभाग, आरटीओ व पोलीस प्रशासनातर्फे कारवाई केली जाते.
विविध पथकांच्या माध्यामतून आलेल्या सुचनांवर करडी नजर ठेवून रेती, मुरूम, माती, गिट्टी यासह अन्य गौण खनिजांची वाहतुक करणाऱ्यांवर धाड घातली जाते. रेतीच्या अवैध वाहतुकीमुळे कित्येक अपघात घडले असून ग्रामीण रस्त्यांची दुरवस्थाही झालेली आहे. भंडारा, तुमसर, मोहाडी, पवनी व लाखांदूर तालुक्यात रेती चोरीच्या सर्वाधिक घटना घडत आहेत.
१ एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ पर्यंत जिल्हा प्रशासनाने गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीची एकूण १,५८८ प्रकरणे दाखल केली आहे. यापैकी १,३६५ प्रकरणे ही केवळ रेतीच्या अवैध वाहतुकीची आहेत. उर्वरीत २२३ प्रकरणे ही मुरूम, माती, गिट्टी व अन्य गौण खनिजांच्या चोरीची आहेत. या कारवाईतून प्रशासनाला एक कोटी ९ लक्ष रूपयांचा महसुल प्राप्त झालेला आहे. ही मोहीम आणखी तीव्र करण्याची गरज आहे.
गौण खनिजांच्या बाबतीत सुसंपन्न असलेल्या भंडारा जिल्ह्यात तस्करांवर निगराणी ठेवण्यासाठी संबंधित विभागातील पथके नेहमी दक्ष असतात. विशेषत: वाळू तस्करांवर नजर ठेवण्यासाठी अन्य विभागांचेही सहकार्य लाभत आहे.
- सं. श्री. जोशी,
जिल्हा खनिकर्म अधिकारी, भंडारा
महसूल वसुलीत तुमसर उपविभाग जिल्ह्यात अव्वल
मोहन भोयर ल्ल तुमसर
भंडारा जिल्ह्यात तुमसर उपविभागाने सन २०१४ - २०१५ मध्ये अवैध गौण खनिज महसूल वसुलीत अव्वल स्थानावर असून तुमसर उपविभागात मोहाडी महसूल वसुलीत प्रथम क्रमांकावर आहे.
तुमसर तालुक्यात २३ लक्ष ४० हजार ५२० रुपयांचा दंड वसुल करण्यात आले. तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज आहे. या गौण खनिजांचे नियमबाह्य उत्खनन व वाहतूक सर्रास होत होती. यावर अंकुश लावण्याकरिता जिल्हा तथा तालुका प्रशासनाने कंबर कसली. भंडारा जिल्ह्यात याकरिता तीन उपविभाग आहेत. यात भंडारा, तुमसर व साकोली उपविभागांचा समावेश आहे. तुमसर उपविभागात मोहाडी तालुक्याचा समावेश आहे. मोहाडी महसूल विभागाने वसुलीत प्रथम स्थान पटकाविले आहे. तहसीलदार सचिन यादव, नायब तहसीलदार अरविंद हिंगे, महेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पथक गढित करण्यात आले. या पथकाने सन २०१४-१५ पर्यंत २३ लक्ष ४० हजार ५२० रुपयांचा अवैध गौण खनिज महसूल वसुली केली अहे.
दगड, गिट्टी ३ लक्ष १५ हजार ७७०, मुरुम १ लक्ष १५ हजार ३०, माती १ लक्ष ४७ हजार २०, रेती १७ लक्ष ९५ हजारचा समावेश आहे. रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक यांचा जास्त समावेश आहे. प्रत्येक नदीघाटावर पोलीस व महसूल विभागाचे पथक शासनाने तैनात केले तर रेतीचे नियमबाह्य उत्खनन व उचल होणार नाही. पर्यावरणाचेही नुकसान होणार नाही व शासनाचा महसूल निश्चित वाढेल.

Web Title: Revenue from illegal minor minerals fetched 1.9 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.