महसूल विभाग विकासात्मक कार्याचा कणा आहे
By Admin | Updated: August 3, 2014 23:10 IST2014-08-03T23:10:51+5:302014-08-03T23:10:51+5:30
भंडारा: विकास कामासाठी लागणारा महसूल गोळा करण्यासोबतच विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे दिव्य कायदा व सुव्यवस्था सांभाळून महसूल विभाग पार पाडत असतो.

महसूल विभाग विकासात्मक कार्याचा कणा आहे
भंडारा : भंडारा: विकास कामासाठी लागणारा महसूल गोळा करण्यासोबतच विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे दिव्य कायदा व सुव्यवस्था सांभाळून महसूल विभाग पार पाडत असतो. म्हणूनच महसूल विभाग हा विकासात्मक कार्याचा कणा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.
येथील पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मिलींद बंसोड, उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुनील पडोळे, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, अशोक लटारे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, नियोजन अधिकारी धनंजय सूटे, जिल्हा सूचना अधिकारी लोखंडे आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी १६ पुनर्वसित गावांना महसुली गावाचा दर्जा दिल्याची घोषणा केली. अभिलेख सुरक्षित राखण्यासाठी अभिलेखाचे स्कॅनिंग करुन ठेवण्यास महसूल दिनापासून कळ दाबून प्रारंभ केला. जिल्हाधिकारी म्हणाल्या, आजच्या महसूल दिवसापासून ई-फेरफार करण्यास सुरुवात झाली असून पवनी तालुक्यापासून त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे. तसेच शिधापत्रिका, प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी मंडळ व तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षीपासून महसूल कर्मचाऱ्यांच्या गुणवत्ताप्राप्त पाल्यांचा सत्कार महसूल दिनानिमित्त करण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले.
मोहाडीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट, विजय पवार, अरविंद हिंगे यांनी महसूल दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. (शहर प्रतिनिधी)