रेती घाट लिलावातून ५४ कोटींचा महसूल
By Admin | Updated: May 18, 2017 00:31 IST2017-05-18T00:31:11+5:302017-05-18T00:31:11+5:30
गौण खनिजांच्या बाबतीत परिपूर्णता लाभलेल्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा प्रशासनाला रेती घाटांचे लिलाव, ...

रेती घाट लिलावातून ५४ कोटींचा महसूल
जिल्ह्यात ५३ रेतीघाट : केवळ २७ रेतीघाटांचे लिलाव
इंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्क
गौण खनिजांच्या बाबतीत परिपूर्णता लाभलेल्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा प्रशासनाला रेती घाटांचे लिलाव, दंड व अन्य वसुलीतून ५४ कोटी ११ लाखांचा महसुल मिळाला आहे. दुसरीकडे मात्र रेती तस्करीच्या घटना खुलेआम सुरू असल्याने यावर आळा बसविणे जिकरीचे ठरत आहे.
जिल्ह्यातील जीवनदायीनी वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमध्ये रेतीचा वारेमाप साठा आहे. याच संधीचे सोने रेती तस्कर करीत आहेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ असो की मध्यरात्र, रेतीची तस्करी बंद आहे, असे दिसून येत नाही. यावर कित्येक ठिकाणी महसूल प्रशासनाने कारवाई केली असली तरी रेती तस्करांच्या मुसक्या आवयण्यात जिल्हा प्रशासनाला यश लाभलेले नाही.
गत वर्षभरात जिल्हा खनिकर्म विभागामार्फत जिल्हाभरातील ५३ रेतीघाटांपैकी २७ रेती घाटांचा लिाव करण्यात आला. यातून २७ कोटी ९५ लक्ष रूपयांचा महसूल मिळाला. पाच वर्षांसाठी दीर्घ खनिपट्टा अंतर्गत प्रशासनाला ५ कोटी ९९ लक्ष रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. रेतीचे अवैध खनन केल्याप्रकरणी केलेल्या कारवाईतून ३ कोटी ४६ लक्ष १८ हजार रूपयांची वसुली करण्यात आली. तद्वतच इतर विभागाकडून गौण खनिजांचे वापर केल्याने त्याकडून १४ कोटी पाच लक्ष तर तात्पुरता परवाना देण्यापोटी शासनाला २ कोटी ६३ लाखांचा निधी मिळाला आहे. यासर्व कारवाईतून जिल्हा प्रशासनाला ५४ कोटी ११ लक्ष २५ हजर रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
नियमाप्रमाणे जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव करण्यात आले आहे. यातूनच शासनाला महसुल प्राप्त झाला आहे. रेती तस्करांवर अंकुश लावण्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य असणे अत्यंत गरजेचे आहे.
- सुरेश नैताम
जिल्हा खनिकर्म अधिकारी, भंडारा.