ग्राहकाचे ३७ हजार परत करा
By Admin | Updated: November 29, 2014 00:46 IST2014-11-29T00:46:41+5:302014-11-29T00:46:41+5:30
कर्जावर खरेदी केलेल्या दुचाकीची रक्कम पुर्णत: भरुनही मूळ नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या लक्ष्मी मोटर्स लाखनी ....

ग्राहकाचे ३७ हजार परत करा
भंडारा : कर्जावर खरेदी केलेल्या दुचाकीची रक्कम पुर्णत: भरुनही मूळ नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या लक्ष्मी मोटर्स लाखनी आणि वृषभ फायनान्स गोंदिया यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकाचे ३७ हजार परत करण्याचे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी दिले.
हिचिंद्र हिवाजी बावणे रा. मोगरा ता. लाखनी यांनी लक्ष्मी मोटर्स लाखनी येथून दि.२८ मे रोजी ४४,७६३ रूपयांमध्ये दुचाकी वाहन खरेदी केले. त्याकरीता त्यांनी २१,२५० रूपये जमा केले. ऊर्वरित २३,५१३ रूपयाचे कर्ज वृषभ फायनान्स गोंदिया या वित्तीय कंपनीकडून घेतले. सदर कर्ज २४ समान मासिक हप्त्यामध्ये १,६८० रूपयाप्रमाणे जून २०११ पासून भरावयाचे होते. हिचिंद्र बावणे यांनी सदर वाहन लक्ष्मी मोटर्स लाखनीकडून खरेदी केले असून वृषभ फायनान्सच्या नियमानुसार सुरूवातीचे समान मासिक कर्ज परतफेडीचे नऊ हप्ते वृषभ फायनान्समध्ये भरण्यासाठी लक्ष्मी मोटर्सकडे जमा केले. ऊर्वरित १४ हप्ते लक्ष्मी मोटर्सच्या भंडारा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेच्या लाखनी शाखेत जमा केले. त्यानंतर २९ मे २०१२ रोजी फायनान्स कंपनीचे कर्मचारी बावणे यांच्याकडे आले. त्यांनी दोन हप्त्याची रक्कम भरली नाही, असे सांगून दीड हजार रूपये दंडाची रक्कम वसूल केली. त्यानंतर बावणे यांनी गोंदिया येथे वृषभ फायनान्सच्या व्यवस्थापकाशी भेट घेतली. त्यांना वाहनाचे मुळ नोंदणी प्रमाणपत्र परत मागितले. मात्र व्यवस्थापकाने तुमच्याकडे १०,८४० रूपये शिल्लक आहे. ही रक्कम भरल्याशिवाय नोंदणी प्रमाणपत्र मिळणार नाही, असे सांगितले. त्यानंतर १७ आॅक्टोंबर २०१३ रोजी फायनान्स कंपनीचे कर्मचाऱ्यांनी बावणे यांना रकमेची मागणी केली. याप्रकरणी बावने यांनी पालांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करता न्यायालयात दाद मागण्याची समज दिली. त्यानंतर बावणे यांनी भंडारा येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली.
न्यायालयाने साक्ष पुराव्याच्या तपासाअंती ग्राहक मंचने वृषभ फायनान्स कंपनीने वाहनाची मूळ नोंदणी प्रमाणपत्र परत करावे, मोटर वाहन कायद्याप्रमाणे वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील फायनान्सरचे नाव कमी करावे, मानसिक व शारीरिक त्रास दिल्यामुळे लक्ष्मी मोटर्स यांनी १० हजार रूपये व वृषभ फायनान्स यांनी १५ हजार रूपये तसेच नोटीसचा खर्च म्हणून दोन हजार रूपये द्यावे, असे आदेश दिले.
लक्ष्मी मोटर्स व वृषभ फायनान्सने बावणे यांना तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी पाच हजार रूपये असे १० हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहे. (प्रतिनिधी)