पाणी तपासणीची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभागावर
By Admin | Updated: April 4, 2015 00:09 IST2015-04-04T00:09:50+5:302015-04-04T00:09:50+5:30
जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणातील पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांची जबाबदारी १ एप्रिलपासून भूजल सर्वेक्षण विभागाकडे आली आहे.

पाणी तपासणीची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभागावर
भंडारा : जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणातील पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांची जबाबदारी १ एप्रिलपासून भूजल सर्वेक्षण विभागाकडे आली आहे. परंतु या विभागात अनुभव व तज्ज्ञांची वाणवा आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी दूषित पाण्यामुळे साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होतो. त्यावर नियंत्रणासाठी जिल्हा पातळीवर आरोग्य विभागाच्या अंतर्गत पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा होत्या. त्यानंतर शहराप्रमाणे ग्रामीण नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने या जिल्हास्तरीय प्रयोगशाळांच्या नियंत्रणातील प्रत्येक जिल्ह्यात तीन ते सहा उपविभागीय प्रयोगशाळांची निर्मिती केली आहे.
प्रयोगशाळांमधील सर्व कर्मचारी कंत्राट तत्वावर घेण्यात आले. पण त्यांच्यावर जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांचे नियंत्रण होते. त्यामुळे पाण्याचे नमूने तपासणीसाठी घेणे, दूषित पाणी पुरवठ्याबाबत आरोग्य विभागातर्फे सूचना देणे, उपाययोजना करणे, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबाबत माहिती देऊन दूषित पाणी साठ्याबाबत प्रशासनाला दक्षतेच्या सूचना देणे, अशी कामे जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयातून सुरू होती. मात्र अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे ज्यांच्याकडे प्रयोग शाळेबाबत यंत्रणा नाही, तज्ज्ञ अधिकारी नाहीत त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. आरोय विभागाची जबाबदारी कमी झाली आहे. (प्रतिनिधी)
यापूर्वीही झाला होता निर्णय
राज्य शासनाने १ जानेवारीपासून पाणी गुणवत्ता तपासणीची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता पण तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा तो निर्णय मागे घेत १ एप्रिल २०१५ पासून नवीन आर्थिक वर्षांपासून हस्तांतरीत करण्याचा आदेश काढला आहे.
जिल्ह्यात उपविभागीय व जिल्हास्तरीय प्रयोगशाळा आहेत. अशात राज्य शासनाने भूजल सर्वेक्षणासोबतच पाण्याची गुणवत्ताही आमच्या विभागातर्फे सांगण्यात येईल. नवी जबाबदारी आम्ही यशस्वी करू असे भूजल सर्वेक्षण विभागाच्या भूवैज्ञानिक यांनी सांगितले.