देशाची एकता व अखंडता कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वांची
By Admin | Updated: November 2, 2015 00:49 IST2015-11-02T00:49:32+5:302015-11-02T00:49:32+5:30
भाषा, राहणीमान, खानपान, संस्कृती याबाबतीत विविधता असूनही एकता असणारा भारत हा जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे. ..

देशाची एकता व अखंडता कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वांची
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : एकता व संकल्प दिनाचे आयोजन
भंडारा : भाषा, राहणीमान, खानपान, संस्कृती याबाबतीत विविधता असूनही एकता असणारा भारत हा जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे. देशाची ही एकता, अखंडता अबाधित राहण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बहुमुल्य योगदान दिले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन देशाची एकता अखंडीत राखण्याची जबाबदारी आता आपल्याला पार पाडायची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संकल्प दिनाचे आयोजन जिल्हा क्रिडा संकुल येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप झळके, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, शिक्षणाधिकारी किसन शेंडे, तहसिलदार सुशांत बनसोडे उपस्थित होते.
यावेळी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला स्कॉऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी माल्यार्पण केले. जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप झळके यांनी एकता दौडला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सर्व उपस्थितांना एकतेची शपथ दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र निंबाळकर म्हणाले, देशाची एकता, अखंडता व सुरक्षितता राखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. अशावेळी आपापसातील मतभेद व कलह देशाची सार्वभौमत्वता टिकविण्यासाठी मोठी अडचण ठरते. आपण सर्वांशी मैत्रीची भावना टिकविली पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी हातभार लावण्याची आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.
राष्ट्रीय एकता दौडमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक, पोलिस तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून प्रारंभ होऊन त्रिमूर्ती चौक मार्गे- मुस्लीम लॉयब्ररी चौक- पोस्ट आॅफिस चौक यामार्गे शिवाजी क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार आणि संचालन क्रिडा अधिकारी अनिराम मरसकोल्हे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)