पडित जमीन सर्व्हेक्षणासाठी घेतला ठराव
By Admin | Updated: September 17, 2016 00:59 IST2016-09-17T00:59:27+5:302016-09-17T00:59:27+5:30
करडी, मुंढरी जि. प. क्षेत्रात अपुऱ्या पावसाने रोवणी रखडून हजारो एकर जमीन पडित राहिल्याच औचित्याचा मुद्दा

पडित जमीन सर्व्हेक्षणासाठी घेतला ठराव
करडी (पालोरा) : करडी, मुंढरी जि. प. क्षेत्रात अपुऱ्या पावसाने रोवणी रखडून हजारो एकर जमीन पडित राहिल्याच औचित्याचा मुद्दा मोहाडी पंचायत समितीच्या बैठकीत १५ सप्टेंबर रोजी पं.स. सदस्य महादेव बुरडे यांनी मांडला. त्यावर चर्चा करुन शासनाने सर्व्हेक्षणाचे आदेश देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
खरिप हंगाम आॅगस्ट २०१६ पर्यंत करडी, मुंढरी परिसरात ५० टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला. पऱ्हे दिड महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे झाले असतांना रोवणीलायक पाऊस पडला नाही. परिणामी शेतकऱ्यांना रोवणी करता आली नाही. शेतबोळ्या, शेततळे व लहान-मोठ्या तलावात, नाल्यात पाण्याचा ठणठणाट होता. जिल्हा कृषी अधिक्षक नलिनी भोयर यांचे सुचनेनुसार उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे यांच्या करडी परिसरातील पाहणीत हे सत्य दिसून आले. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला रोवणी करता आली नाही. शासन प्रशासनाला सदर बाब माहित असतांनाही अजुनही रोवणी अभावी पडित राहिलेल्या शेतजमिनीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश यंत्रणांना देण्यात आलेले नाहीत. शेतकरी मागील वर्षाप्रमाणे संकटात सापडला असतांना त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याचा डाव लोकप्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक खेळाला जात आहे. शासनाने सक्तीने पिक विमा काढून घेतला. आता नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे व त्यांना पिक विमा नुकसान भरपाईस पात्र ठरविण्यास चौकशीचे आदेश देण्याचे काम शासनाचे नाही काय? प्रकरणी पं.स. सदस्य महादेव बुरडे यांनी अत्यंत अभ्यासपुर्ण माहिती मोहाडी पं.स. च्या बैठकीत मांडली. त्यावर सविस्तर चर्चा होवून शासनाने सर्व्हेक्षणाचा आदेश देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. (वार्ताहर)