आरक्षण सोडतीमुळे विद्यमानांना फटका

By Admin | Updated: April 5, 2015 00:43 IST2015-04-05T00:43:48+5:302015-04-05T00:43:48+5:30

राज्य शासनाने जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर आणि मोहाडी या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिल्यानंतर शनिवारला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

Residents leave the current due to drawback | आरक्षण सोडतीमुळे विद्यमानांना फटका

आरक्षण सोडतीमुळे विद्यमानांना फटका

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर : सत्ताधाऱ्यांसाठी प्रतिष्ठेची तर विरोधकांसाठी अस्तित्वाची लढाई
भंडारा :
राज्य शासनाने जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर आणि मोहाडी या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिल्यानंतर शनिवारला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमुळे सर्वांचाच हिरमोड झाला आहे. बदललेल्या क्षेत्रातून नवीन उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे. ही निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी प्रतिष्ठेची तर विरोधकांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
शनिवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रभारी निवडणूक अधिकारी प्रविण महाजत उपस्थित होते. या आरक्षण सोडतीचा विद्यमान ५२ जिल्हा परिषद सदस्यांपैकी ४८ क्षेत्रातील उमेदवारांना आरक्षणाचा फटका बसला आहे.
पाच नवीन क्षेत्रांचा समावेश
लोकसंख्येच्या निकषानुसार भंडारा आणि तुमसर या दोन तालुक्यात यापुर्वी नऊ जिल्हा परिषद क्षेत्र होते. आता या तालुक्यात प्रत्येक एक जिल्हा परिषद क्षेत्र वाढल्यामुळे या तालुक्याची संख्या १० वर पोहचली आहे. यात भंडारा तालुक्यात कोथुर्णा, पवनी तालुक्यात पिंपळगाव (निपानी), लाखनी तालुक्यात केसलवाडा (वाघ), लाखांदूर तालुक्यात मोहरणा आणि तुमसर तालुक्यात बपेरा, असे पाच नवीन जिल्हा परिषद क्षेत्र अस्तित्वात आले आहे.
आठ क्षेत्राचे नाव बदलले
आरक्षण सोडतीत काही ठिकाणी नवीन तर काही ठिकाणच्या क्षेत्राचे नाव बदलले आहे. भंडारा तालुक्यात भोजापूरऐवजी खोकरला व शहापूरऐवजी ठाणा, पवनी तालुक्यात भेंडाळाऐवजी ब्रह्मी व कन्हाळगाव ऐवजी सावरला, साकोली तालुक्यात एकोडीऐवजी किन्ही, तुमसर तालुक्यात मिटेवानीऐवजी आंबागड, मोहाडी तालुक्यात मुंढरीऐवजी बेटाळा व खमारी (बुटी) ऐवजी पाचगाव असे क्षेत्राचे नाव बदलले आहे.
४८ पदाधिकारी झाले बाद
२०१० मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अडीच - अडीच वर्षाचा कार्यकाळ ठरवून दिल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समितीचे चार सभापती असे दोन टर्ममधील १२ पदाधिकाऱ्यांपैकी संदीप ताले वगळता ११ पदाधिकाऱ्यांना या आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. यात काहींनी हॅट्रीक तर काहींना दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत प्रवेश मिळाला होता. आरक्षणामुळे त्या ११ पदाधिकाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ येणार आहे.

चार उमेदवार ठरले भाग्यवान
आजच्या आरक्षण सोडतीत चार क्षेत्रातील आरक्षण कायम असल्यामुळे चार उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. यात मोहाडी तालुक्यातील कांद्री क्षेत्राचे किरण अतकरी, तुमसर तालुक्यातील मिटेवानी क्षेत्राचे संदीप ताले आणि लाखांदूर तालुक्यातील सरांडी क्षेत्राचे मनोहर महावाडे व भागडी क्षेत्राचे प्रकाश देशकर यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय राखीव महिला प्रवर्ग
तुमसर तालुक्यात एकूण दहा जिल्हा परिषद क्षेत्रांपैकी सात जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. मोहाडी तालुक्यातील सात क्षेत्रांपैकी पाच, साकोली तालुक्यातील सहा क्षेत्रांपैकी दोन, लाखनी तालुक्यातील सहा क्षेत्रांपैकी तीन, भंडारा तालुक्यातील दहा क्षेत्रांपैकी दोन, पवनी तालुक्यातील सात क्षेत्रांपैकी चार आणि लाखांदूर तालुक्यातील सहा क्षेत्रांपैकी तीन ठिकाणी असे २६ जागा महिलांसाठी राखीव आहेत.
महिलांचा वाटा बरोबरीचा
५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत मागीलवेळी ३३ टक्के महिला आरक्षणामुळे महिला सदस्य संख्या १८ होती. यावेळी ५० टक्के महिला आरक्षणामुळे महिला सदस्य संख्या २६ राहणार आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्गामधून पाच, अनुसूचित जमाती प्रवर्गामधून दोन, ओबीसी प्रवर्गामधून सात आणि खुला प्रवर्गामधून १२ असे एकूण २६ महिला उमेदवार राहतील. सात पंचायत समितीमधील १०४ क्षेत्रांपैकी ५२ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे सत्तेत महिलांचा वाटा बरोबरीचा राहणार आहे.
काहींची न्यायालयात धाव
नगर पंचायतीची घोषणा झाल्यानंतर नव्याने काढण्यात येणा-या आरक्षण सोडतीत मतदार क्षेत्र राखीव झाले तर घरी बसण्याची वेळ येईल. त्यामुळे काहींनी आधी क्षेत्र घोषित करावे, नंतरच सोडत काढण्यात यावी, या मागणीसाठी काही पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसारच आज शनिवारला जिल्हा परिषद आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली आहे.
- डॉ. माधवी खोडे, जिल्हाधिकारी, भंडारा.

Web Title: Residents leave the current due to drawback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.