पावसाअभावी ‘जलाशये’ अजूनही तहानलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 00:32 IST2016-07-31T00:32:12+5:302016-07-31T00:32:12+5:30
जिल्ह्यात अजूनही धो-धो बरसणाऱ्या पावसाने हजेरी लावलेली नाही.

पावसाअभावी ‘जलाशये’ अजूनही तहानलेलीच
धो-धो पावसाची गरज : अर्ध्या पावसाळ्यानंतरही मध्यम प्रकल्पात ठणठणाठ
भंडारा : जिल्ह्यात अजूनही धो-धो बरसणाऱ्या पावसाने हजेरी लावलेली नाही. कधी रिमझिम तर कधी एखादा ठोक अशा प्रमाणात हजेरी लावणाऱ्या पावसामुळे पाणी जमिनीत मुरत असले तरी मध्यम आणि मोठ्या जलाशयांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. अर्धा पावसाळा संपला असला तरी या जलाशयांमध्ये ५० टक्केही पाणीसाठा नाही.
यातच खरीप हंगामात वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पावसाची स्थिती चांगली राहील, असा अंदाज होता. मात्र हा अंदाज फोल ठरत आहे. बांध्यात रोवणीयोग्य पाणी साचत नसल्यामुळे शेतकऱ्यांना धानाची रोवणी कशी करावी असा प्रश्न पडला आहे.
सध्या जिल्ह्यातील इटियाडोह धरण २९.८५ टक्के, शिरपूर जलाशय ३०.८४ टक्के, पुजारीटोला धरण ४०.५९ टक्के, कालीसराड ३६.४२ टक्के तचर मध्यप्रदेशातील संजय सरोवर ६४.६५ टक्के भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली. सध्या संजय सरोवराचे दोन गेट ०.२१ मीटरपर्यंत उघडून ७०.७९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (प्रतिनिधी)
मध्यम प्रकल्पातही जेमतेम साठा
जिल्ह्यातील काही मध्यम प्रकल्पातही पाण्याचा ठणठणाठ दिसून येत आहे. बोदलकसा जलाशयात जलसाठा ७.४१ दलघमी असून त्याची टक्केवारी ४५.०३ आहे. चोरखमारा जलाशयात जलसाठा ३.४० दलघमी (१६.३६ टक्के) आहे. चुलबंद जलाशयात जलसाठा १.८९ दलघमी (१०.५४ टक्के) आहे. मानागड प्रकल्पात ०.६१ दलघमी (८.६१ टक्के) आहे. रेंगेपार प्रकल्पात ०.९३ दलघमी (२६.२० टक्के) आहे. संग्रामपूर २.३४ दलघमी (६०.५० टक्के) आहे. कटंगी ६.६४ दलघमी (७०.६६ टक्के) आहे. कलपाथरी २.२७ दलघमी (३४.४२ टक्के), उमरझरी १.६७ दलघमी (३०.३० टक्के) व खळबंदा प्रकल्पात २.७३ दलघमी (१७.०९ टक्के) जलसाठा आहे.
२४ तासात १.२ मिमी पाऊस
मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी केवळ १.२ मिमी पाऊस पडला आहे. १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ५३६.६ मिमी एवढा पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासात तालुकानिहाय पडलेला पाऊस व कंसात आजपर्यंत झालेला पाऊस असा आहे. गोंदिया तालुका निरंक (४२१ मिमी), तिरोडा निरंक (६१६.२ मिमी), गोरेगाव ०.४ मिमी (४८५ मिमी), आमगाव निरंक (४२५.२ मिमी), सालेकसा निरंक (५५२ मिमी), देवरी २ मिमी (६०८ मिमी), सडक-अर्जुनी ७.२ मिमी (६४३.८ मिमी), अर्जुनी-मोरगाव निरंक (५४२.१ मिमी) अशी पावसाची नोंद आहे.
जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम
जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. जून महिन्यात दगा देणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात बऱ्यापैकी हजेरी लावली. संपूर्ण महिनाभर नियमितपणे पावसाचे हजेरी लावणे सुरू आहे. मात्र येणारा पाऊस रिमझिम स्वरूपाचा जास्त असतो. अधूनमधून एखादा ठोक येतो पण ते पाणी काही वेळातच जमिनीत मुरून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकासाठी रोवणीयोग्य पाणी बांधीत जमा होत नाही. यामुळे पूर्णपणे वरथेंबी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे गणित बिघडत आहे. रोवणीसाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत.