आगीमुळे वनसंपदेची राखरांगोळी
By Admin | Updated: May 17, 2017 00:21 IST2017-05-17T00:21:35+5:302017-05-17T00:21:35+5:30
कृत्रिम वणवण्यामुळे वनसंपदेची राखरांगोळी होत असून तेंदूपत्ता ठेकेदार झाडांना नवीन पालवी येण्यासाठी जंगलाला आगी लावतात.

आगीमुळे वनसंपदेची राखरांगोळी
वनविभागाचे दुर्लक्ष : प्राण्यांची जीवितहानी टळली
शिवशंकर बावनकुळे । लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : कृत्रिम वणवण्यामुळे वनसंपदेची राखरांगोळी होत असून तेंदूपत्ता ठेकेदार झाडांना नवीन पालवी येण्यासाठी जंगलाला आगी लावतात. त्यात मौल्यवान झाडांची राखरांगोळी होत आहे. वनविभागाने आगप्रतिबंधासाठी लाखो रुपये खर्च करून जंगलात जाळरेषा आखून वनक्षेत्राची लहान लहान भाग तयार केले. गस्त टॉवर वाढविले. मात्र आगीच्या घटना वाढतच असतात. दोन दिवसापूर्वी मोहघाटा जंगलाला लागलेल्या आगीपासून जंगलाचे रक्षण करण्यासाठी वनकर्मचारी प्रयत्न केले. मात्र प्रयत्न व्यर्थ ठरले.
या आगीत हजारो हेक्टर जंगलाचे नुकसान होत आहे. वृक्षासोबत वन्यजीवांनाही आगीचा फटका बसत आहे. मे महिन्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्यानंतर तेंदूपत्ता अधिकाधिक जमा करण्यासाठी झाडांना नवीन पालवी फुटण्यासाठी या झाडांना आग लावली जाते. उष्ण वातावरणात अधिक पाने फुटत असल्यामुळे जंगलाला आग लावली जाते.
नागझिरा अभयारण्य जंगलात मार्च ते मे महिन्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी आग लागली. ६०० चौरस किलोमिटर क्षेत्रात नागझिरा, नवीन नागझिरा, कोका, नवेगावबांध अभयारण्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नियंत्रण मिळविले आहे. नागझिरा, नवेगाव, उमरझरी, पिटेझरी, डोंगरगाव, बोंडे, कोका याठिकाणी टॉवर उभारण्यात आले.
या टॉवरवरून २४ तास आगीवर नियंत्रण ठेवले जात आहे. जंगलातील आगीच्या १९ टक्के आगी मानवनिर्मित असतात. आग लागल्यानंतर ती पसरण्याच्या आत विझविण्यासाठी ब्लोअर्सचा वापर केला जात आहे. वनकर्मचाऱ्यामार्फत झाडाच्या फांद्या तोडून आगीवर फांद्याच्या सहाय्याने मारा करून आग विझविण्याचे प्रशिक्षण दिले आहे.