शिकाऊ परवान्याची मुदत संपणाऱ्यांना दिलासा
By Admin | Updated: August 9, 2015 00:49 IST2015-08-09T00:49:43+5:302015-08-09T00:49:43+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू...

शिकाऊ परवान्याची मुदत संपणाऱ्यांना दिलासा
थेट चाचणी : परिवहन आयुक्तांचे निर्देश
भंडारा : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी व उमेदवारांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली ‘आॅनलाईन अपार्इंटमेन्ट’ योजना गैरसोयीची ठरत असल्याची राज्यभरात ओरड होत असताना नवे परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी यावर उपायही शोधून उमेदवारांना दिलासा दिला आहे.
त्यांनी शिकाऊ वाहन परवान्याची (लर्निंग लायसन्स) मुदत संपण्याच्या तारखेनंतर अपॉईन्टमेंट मिळणाऱ्या उमेदवाराची विना अपॉईन्टमेंट चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहे. या संदभार्तील पत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) प्राप्त झाले आहे.
आरटीओमध्ये वाहन परवाना काढण्यासाठी होत असलेली उमेदवारांची गर्दी, तासनतास रांगेत उभे राहण्याची येत असलेली पाळी, त्यामुळे वाया जात असलेला वेळ आणि श्रम, या सर्व व्यापातून मुक्त होण्यासाठी परिवहन विभागाने आॅनलाईन अपार्इंटमेन्ट योजना सुरू केली. १७ सप्टेंबर २०१४ पासून शिकाऊ परवान्यासाठी तर १ डिसेंबर २०१४ पासून कायम परवान्यासाठी या योजनेची सक्ती केली आहे.
सद्यस्थितीत आरटीओ कार्यालयात कायम वाहन परवान्यासाठी एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अपार्इंटमेन्ट मिळत आहे. पूर्वी याचा फटका शिकाऊ परवान्याची मुदत संपायला आलेल्या अनेक उमेदवारांना बसत होता. यावर उपाय म्हणून परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांना दर दिवशीच्या परवान्यांची संख्या वाढवून देण्याचे निर्देश दिले होते, तरीही ओरड सुरू होती. अखेर नवे परिवहन आयुक्तांनी यात लक्ष घालून मार्ग काढला. (जिल्हा प्रतिनिधी)
ज्या उमेदवारांनी कायम परवाना चाचणीकरिता अपार्इंटमेन्ट घेतली आहे, परंतु त्यांना शिकाऊ परवान्याच्या मुदतीच्या तारखेनंतरची अपार्इंटमेन्ट मिळालेली आहे, अशा उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून शिकावू अनुज्ञप्तीच्या समाप्तीच्या शेवटच्या आठवड्यात या उमेदवरांची विना अपार्इंटमेन्ट कायम परवान्याची चाचणी घेण्याचे निर्देश दिले. मात्र, अशा उमेदवारांना चाचणीला येतेवेळी त्यांना मुदतीनंतरची अपार्इंटमेन्ट मिळाल्याबाबतचा पुरावा सोबत घेऊन येणे आवश्यक असल्याची अट घातली आहे.
शेवटी अपार्इंटमेन्ट घेणाऱ्यांना सुविधा नाही
शिकाऊ परवान्याची मुदत संपण्याच्या शेवटच्या महिन्यात ज्या उमेदवारांनी अपॉईन्टमेंट घेतलेली असेल व त्यांना मुदतीनंतरची अपॉईन्टमेंट मिळालेली असेल, त्या उमेदवाराना ही सुविधा लागू होणार नाही, असेही आयुक्तांनी पत्रात नमूद केले आहे.