सालेभाटा येथे खोल विहिरीत पडलेल्या अजगराची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST2021-05-11T04:37:39+5:302021-05-11T04:37:39+5:30

ग्रीन फ्रेण्ड्स व वनविभागाने घेतले दोन दिवस परिश्रम : जखमी वानराचीपण सुरक्षित सुटका लाखनी : येथून आठ किमी अंतरावर ...

Rescue of a dragon that fell into a deep well at Salebhata | सालेभाटा येथे खोल विहिरीत पडलेल्या अजगराची सुटका

सालेभाटा येथे खोल विहिरीत पडलेल्या अजगराची सुटका

ग्रीन फ्रेण्ड्स व वनविभागाने घेतले दोन दिवस परिश्रम : जखमी वानराचीपण सुरक्षित सुटका

लाखनी : येथून आठ किमी अंतरावर असलेल्या सालेभाटा गावातील कृष्णा खंडाईत यांच्या मालकीच्या ३० फूट खोल विहिरीत अजगर साप पडला. याची माहिती लाखनी येथील ग्रीन फ्रेण्ड्स नेचर क्लबचा निसर्गमित्र पंकज भिवगडे याला मिळाली. त्याने तात्काळ ही माहिती ग्रीन फ्रेण्ड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांना दिली. विहिरीला कड्या नसल्याने व जुनाट बांधणीची असल्याने अजगर वन्यजीव १९७२च्या राखीव वनसूचित असल्याने त्याला बाहेर काढण्याचा मोठा प्रश्न आ वासून सर्वांसमोर तसेच सालेभाटा ग्रामवासीयांसमोर उभा राहिला. ग्रीन फ्रेण्ड‌्च्या ग्रुपवर माहिती टाकल्यानंतर फ्रेण्ड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने व मानद वन्यजीव अधिकारी प्रा.नदीम खान यांनी तत्परतेने हालचाल करीत जिल्हा वनाधिकारी एस. बी. भलावी यांना माहिती दिली.

त्यांनी लाखनी वनविभागचे वनक्षेत्राधिकारी ए.जे. मेश्राम यांना कळविले. तत्पूर्वी घटनास्थळावर ग्रीन फ्रेण्ड्सचे निसर्गमित्र, सर्पमित्र पंकज भिवगडे, मयूर गायधने, दर्वेश दिघोरे यांनी स्थानिक ग्रामवासीयांचे सहकार्य घेत सुरक्षा बेल्ट मागविला. सुरक्षा बेल्ट व दोर मयूरला बांधण्यापूर्वी विहिरीत विषारी वायू नसल्याची खात्री करून घेण्यात आली. तळाशी कपारीत असलेल्या छिद्रामध्ये हा सात फुटांचा अजगर आतमध्ये गेला. त्यामुळे त्याला काढणे अवघड झाले. दरम्यान, लाखनी वनक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक कृष्णा सानप व तुकाराम डावखरे, वन्यजीवप्रेमी रितेश कांबळे हे घटनास्थळी पोहचले. पुन्हा मोहीम आखली पण दोन तास प्रयत्न करूनही अजगराला बाहेर काढणे अशक्य झाले.

मोहीम स्थगित करून दुसऱ्या दिवशी दुपारी भंडारा वनविभाग सुटका पथकाचे प्रमुख अनिल शेळके, ग्रीन फ्रेण्ड्सचे पंकज भिवगडे, सर्पमित्र मयूर गायधने, दर्वेश दिघोरे, अनुराग गायधने भंडारा हे व लाखनी वनविभागाचे वनरक्षक कृष्णा सानप तसेच टेंभुर्णे यांचे पुन्हा प्रयत्न सुरू झाले. रेस्क्यू टिम भंडाराचे अनिल शेळके व ग्रीन फ्रेण्ड्सचा सर्पमित्र मयूर गायधने सुरक्षा साधने वापरून विहिरीत खाली उतरल्यावर त्यांनी एक तासाच्या अथक प्रयत्नाने अजगराला कपारीतल्या बिळातून बाहेर काढले व सर्वांनी एकच सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतर पंचनामा करून नजीकच्या जंगलात अजगराला सुरक्षित सोडण्यात आले. त्याच सायंकाळी जेएमसी कंपनी प्लांटच्या शेताजवळ जखमी अवस्थतेतील एका वानराबद्दल माहिती ग्रीन फ्रेण्ड‌्सचा सर्पमित्र सलाम बेग मिर्झा यांना मिळाली. याची माहिती ग्रीन फ्रेण्ड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांना दिल्यावर त्यांनी सर्पमित्र मयूर गायधनेमार्फत लाखनी वनविभागाला कळविले. लाखनी वनरक्षक कृष्णा सानप व इतर वनकर्मचारी यांनी जखमी वानरावर जाळे टाकून त्याला ताब्यात घेऊन त्याची सुरक्षित सुटका केली. ग्रीन फ्रेण्ड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, सर्व पदाधिकारी, निसर्गप्रेमी नागरिक तसेच मानद वन्यजीव अधिकारी प्रा. नदीम खान व शाहिद खान यांनीसुद्धा ग्रीन फ्रेण्ड्सच्या निसर्गमित्रांचे व वनकर्मचारी लाखनी व रेस्क्यू टीमचे कौतुक केले.

Web Title: Rescue of a dragon that fell into a deep well at Salebhata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.