जंगलात आग लागलेली दिसताच वन विभागाला कळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:13+5:302021-04-06T04:34:13+5:30
नीतेश धनविजय : मोहफूल गोळा करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी पवनारा : एप्रिलला सुरवात होताच सूर्य आग ओकू लागल्याने वातावरणातील तापमान ...

जंगलात आग लागलेली दिसताच वन विभागाला कळवा
नीतेश धनविजय : मोहफूल गोळा करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी
पवनारा : एप्रिलला सुरवात होताच सूर्य आग ओकू लागल्याने वातावरणातील तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने जंगलात वणवे लागत असून ते विझविण्याकरिता वनकर्मचाऱ्यांना रात्रंदिवस तारेवरची कसरत करावी लागते. वणवे लागण्याचे पुन्हा एक कारण पुढे आले ते मोहफुलांचा बहर. ही जंगलाची देण जंगलाच्या हानीस कारणीभूत ठरत आहे.
मोहफुलापासून गावागावात दारू बनविल्या जात असल्याने मागणी जास्त आहे. मोहफूल गोळा करण्यासाठी घरातील लहानमोठी मंडळी रोज सकाळी जंगलात जातात. सध्या मोहफूल गोळा करण्याचा हंगाम सुरू आहे. मोहफूल वेचण्याकरिता झाडाखालील पालापाचोळ्याचा अडसर येऊ नये म्हणून रात्री आग लावून निघून जात असल्याने जंगलाला आग लागू शकते. असा प्रकार होता कामा नये, म्हणून नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी नीतेश धनविजय आपल्या फिरत्या पथकासह गावागावात जाऊन नागरिकांना जागरूक करीत आहेत.
विशेष म्हणजे लवकरच तेंदूपत्ता हंगाम सुरू होणार आहे. नवीन पाने चांगली यावी म्हणून टेंभूर्णीच्या झाडाला आग लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे अनधिकृत असून कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे जंगलाला आग लागण्याच्या प्रकारात पुन्हा भर पडलेली आहे.
जंगलाला आग लागल्यामुळे अनेक सरपटणारे जीव, पक्ष्यांचे घरटे व मौल्यवान वनसंपदा नष्ट होते. त्याबरोबर वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होते. मानवाला अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे झाडांचीही अत्यंत गरज आहे. त्याचे प्रत्येकाने जतन करायला पाहिजे. कोणत्याही कारणामुळे जंगलाला आग लागल्यास प्रत्येक नागरिकाने जबाबदारी समजून त्वरित वनविभागाला कळवून सहकार्य करावे, असे आवाहन नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी नीतेश धनविजय यांनी केले आहे.