श्रावणबाळ योजनेचे प्रस्ताव निकाली काढा
By Admin | Updated: May 8, 2014 01:26 IST2014-05-08T01:26:30+5:302014-05-08T01:26:30+5:30
मोहाडी तालुक्यातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढून लाभार्थ्यांना श्रावणबाळ योजनेचा तत्काळ लाभ घ्यावा, अशी मागणी आहे.

श्रावणबाळ योजनेचे प्रस्ताव निकाली काढा
भंडारा : मोहाडी तालुक्यातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढून लाभार्थ्यांना श्रावणबाळ योजनेचा तत्काळ लाभ घ्यावा, अशी मागणी आहे.
वृद्धापकाळात वयोगवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तसेच वृद्धापकाळात कोणतेही अवघड काम करणे अशक्य होत असल्यामुळे वृद्ध नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते.
त्यामुळे या वयोवृद्ध नागरिकांसाठी श्रावणबाळ योजनेंतर्गत आर्थिक लाभ देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी योग्य त्या दस्ताऐवजासह तहसील कार्यालय मोहाडी येथील संबंधित विभागात रितसर प्रस्ताव सादर केले आहेत.
सादर केलेल्या प्रस्तावांची तहसीलदार यांचे अधिनस्त असलेल्या समितीमार्फत काटेकोरपणे योग्य तपासणी करून प्रस्ताव विहित कालावधीत मंजूर केले जातात व लाभार्थ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. परंतु संबंधित विभागाच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव गहाळ झाल्याची लाभार्थ्यांची ओरड आहे.
तत्कालीन तहसीलदारांनी बर्याच प्रस्तावांवर स्वाक्षरी करून प्रस्ताव निकाली काढले होते. परंतु त्यातील बरेच प्रस्ताव गहाळ झाले असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर श्रावणबाळ योजनेचे प्रस्ताव निकाली काढताना कोणता लाभार्थी सत्ताधारी पक्षाचा व कोणता लाभार्थी विरोधी पक्षाचा याबाबत विचारपूस करून फक्त सत्ताधारी पक्षाच्या लाभार्थ्यांची प्रकरणे निकाली काढत असल्याने अन्य गरजू गरजवंत लाभार्थ्यांना वेठीस धरून त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव खेळला जात आहे.
वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असून याबाबत संबंधित यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर समितीच्या त्रासाला कंटाळून एखाद्या गरजवंत त्रस्त लाभार्थ्याला प्राण गमवावा लागला तर संबंधित यंत्रणेला जबाबदार का धरण्यात येऊ नये, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
२0१0 ते मार्च २0१४ पर्यंत मोहाडी तालुक्यातील एकूण किती लाभार्थ्यांनी श्रावणबाळ योजनेचे प्रस्ताव सादर केले. त्यापैकी एकूण किती लाभार्थ्यांंचे प्रस्ताव निकाली काढले.
अन्य लाभार्थ्यांचे प्रस्ताव निकाली न काढण्याचे किंवा भेदभाव करण्याचे कारण काय किंवा लाभार्थ्यांंचे प्रस्ताव निकाली काढण्यास अतिविलंब करण्याचे किंवा गहाळ करण्याचे कारण काय? सदर प्रस्ताव १२ मे २0१४ पर्यंंत निकाली काढणार किंवा कसे, या प्रकरणात दोषी कर्मचार्यांवर रितसर कार्यवाही करणार किंवा कसे? वयोवृद्ध लाभार्थ्यांंना वेठीस धरण्याचे कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. याप्रकरणी तहसीलदार यांच्या अधिनस्त संबंधित यंत्रणेने गांभीर्याने विचार करून व वेळीच दखल घेऊन मोहाडी तालुक्यातील श्रावणबाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांंचे प्रस्ताव कायमस्वरुपी निकाली काढून लाभार्थ्यांंना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)