शहरातील भयभीत वातावरण दूर करा

By Admin | Updated: August 4, 2015 00:24 IST2015-08-04T00:24:02+5:302015-08-04T00:24:02+5:30

चोरीसाठी आलेल्या दोन आरोपींनी प्रीती पटेल या महिलेचा खून तर भव्य पटेल व अश्विनी शिंदे या तरुणीवर जीवघेणा हल्ला केला.

Remove the fearful atmosphere of the city | शहरातील भयभीत वातावरण दूर करा

शहरातील भयभीत वातावरण दूर करा

अन्यथा आंदोलन : सर्वपक्षीय जिल्हा कचेरीत धडकले
भंडारा : चोरीसाठी आलेल्या दोन आरोपींनी प्रीती पटेल या महिलेचा खून तर भव्य पटेल व अश्विनी शिंदे या तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणाने शहरात भीतीचे वातावरण असून महिलावर्ग धास्तावलेला आहे. जिल्हा प्रशासनाने या कठोर पावले उचलून भयभीत वातावरण दूर करावे, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांंनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली.
अश्विनी शिंदे या तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना तातडीने शोधून काढले असते तर प्रीती पटेल या महिलेचा खून झाला नसता. मागील काही वर्षांपासून भंडारा शहरात गांजा, चरस, अफिम व ड्रग्स मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. पोलिसांचा या अवैध धंद्यावर वचक नसल्यामुळे हे व्यवसाय फोफावले आहेत. अवैध व्यवसायाचे अड्डे सांगून पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. अशा पोलिसांना निलंबित करावे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. हा खटला चालविण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. मागण्या मान्य न झाल्यास व्यापारी, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशाराही शिष्टमंडळाने दिला. या शिष्टमंडळात जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, नगराध्यक्ष बाबूराव बागडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, चित्रा सावरबांधे, नगरसेवक महेंद्र गडकरी, सुर्यकांत ईलमे, विनय पशिने, विकास मदनकर, प्रेमसागर गणवीर, सुनिल मेंढे, किरीट पटेल यांचा समावेश आहे.
रेडीमेड कपडा व्यापारी असोसिएशन, पंजाब सेवा समिती, भंडारा फोटोग्राफर असोसिएशन, कच्छ वडवा पाटीदार समाज, गुजराती समाज, लघू उद्योग भारती, गुरुनानक देव सेवा मंडळ, भंडारा किराणा व जनरल व्यापारी असोसिएशन, बहिरंगेश्वर देवस्थान कमिटी, भंडारा जिल्हा माहेश्वरी सभा, भंडारा डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन, भंडारा मेटल मर्चट असोसिएशन, भंडारा प्लॉयवूड असोसिएशन, सुवर्णकार समाज, केमिस्ट अ‍ॅन्ड डगीस्ट असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Remove the fearful atmosphere of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.