अपघातस्थळी मदतीसाठी धावणाऱ्यांना दिलासा

By Admin | Updated: August 6, 2015 01:49 IST2015-08-06T01:49:52+5:302015-08-06T01:49:52+5:30

मार्गात अपघात घडल्याचे दिसल्यावर संबंधितांच्या मदतीसाठी धावण्याची इच्छा असूनही पोलिसांच्या चौकशीचा उगीचच ससेमिरा नको म्हणून थांबायचे टाळणाऱ्या ...

Remedies for runners to help in accident | अपघातस्थळी मदतीसाठी धावणाऱ्यांना दिलासा

अपघातस्थळी मदतीसाठी धावणाऱ्यांना दिलासा

मदतकर्त्यांना मिळणार पुरस्कार : राज्य शासनाची अधिसूचना जारी
भंडारा : मार्गात अपघात घडल्याचे दिसल्यावर संबंधितांच्या मदतीसाठी धावण्याची इच्छा असूनही पोलिसांच्या चौकशीचा उगीचच ससेमिरा नको म्हणून थांबायचे टाळणाऱ्या संवेदनशील नागरिकांना आता नव्या अध्यादेशामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
घटनेच्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांना आणि मदतीला धावणाऱ्या नागरिकांना अशा प्रसंगात नाहक त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या मार्ग परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने १२ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातून ही अधिसूचना जारी केली आहे. रस्ते अपघातातील जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावे व मदतीला धावणाऱ्या कर्तव्यदक्ष नागरिकांना त्रास होऊ नये याबाबत या अधिसूचनेत महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
रस्ते अपघातात जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या कर्तव्यदक्ष नागरिकांसाठी राज्य सरकारने पुरस्कार देण्याचीही तयारी दर्शविली आहे. मदतकर्त्या नागरिकांना अपघाताच्या गुन्ह्यात गोवले जाणार नाही, अपघाताची सूचना फोनवरून देणाऱ्या व्यक्तीला व्यक्तीगतरित्या पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याची सक्ती केली जाणार नाही.
अपघाताच्या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शीच्या पुराव्याची आवश्यकता असल्यास केवळ एकदाच चौकशी करण्यात यावी, असे या नव्या अध्यादेशात म्हटले आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या नागरिकांना डॉक्टरांनी अनावश्यक प्रश्न विचारु नये अथवा कुठल्याही वैद्यकीय शुल्काची मागणी करु नये, असेही यात नमूद आहे. महत्त्वाचे म्हणजे, अपघातातील जखमी व्यक्तींवर डॉक्टरांनी तत्काळ उपचार करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्यावे. त्यासाठी मदतकर्त्या नागरिकांना पैसे जमा करण्यास सांगूू नये, अशा आशयाची पाटी सर्वच खासगी व शासकीय रुग्णालयात लावण्यात यावी, असेही निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.
रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्यक्षदर्शी किंवा कर्तव्यदक्ष नागरिक जवळच्या रुग्णालयात घेऊन जाऊ शकतात. यासाठी त्यास अडविण्याची किंवा प्रश्न विचारण्याची गरज नसल्याचे अधिसूचनेत नमूद आहे. कर्तव्यदक्ष नागरिकांना यापुढे त्रास सहन करावा लागणार नाही, अशी सरकारची अपेक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Remedies for runners to help in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.