डोंगरदेवाला सोडलेला बोकड परस्पर विकला
By Admin | Updated: August 30, 2015 00:26 IST2015-08-30T00:26:48+5:302015-08-30T00:26:48+5:30
मध्यप्रदेशातील एका भाविकाने मागील आठवड्यात नवस फेडण्यासाठी डोंगरदेव तिर्थस्थळी आणलेला बोकड,...

डोंगरदेवाला सोडलेला बोकड परस्पर विकला
डोंगरदेव देवस्थानातील गैरप्रकार : दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
करडी : मध्यप्रदेशातील एका भाविकाने मागील आठवड्यात नवस फेडण्यासाठी डोंगरदेव तिर्थस्थळी आणलेला बोकड, देवस्थान पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे न कापता सोडला होता. त्याच दिवशी सायंकाळी काहींनी या बोकडाला पकडून दुसऱ्या इसमाच्या घरी बांधून ठेवला. कुणाचाही संशय नसल्याचे लक्षात येताच, त्याला खाटिकाला विकला. यामुळे भाविकांमध्ये असंतोष पसरला आहे. याप्रकरणी दोषीविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे.
मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव टेकडीच्या पायथ्याशी पूर्व विदर्भ, मध्यप्रदेश व बालाघाट जिल्ह्यातील श्रद्धाळू व भाविकांचे श्रद्धास्थान डोंगरदेव देवस्थान आहे. शासनाने या स्थळाला पर्यटन तिर्थस्थळ म्हणूनही घोषित केले आहे. मुंढरी येथील कामथे परिवारांचे कुलदैवत असल्याने त्यांनीसुद्धा मंदिराचे बांधकाम मागील वर्षी केले. याठिकाणी दूरवरून भाविक येतात. चैत्र महिन्यात यात्रा भरते. देवाला कबुल केलेले कोंबडे, बोकड आणून नवस फेडतात. वर्षानुवर्षापासून ही परंपरा सुरु आहे.
मागील आठवड्यात एका भाविकाने बोकड देऊन नवस फेडला. बोकड कापण्यासाठी मनाई केल्यानंतर अखेर त्यांनी बोकड न कापता, देवाच्या नावावर त्याला जिवंत सोडून निघून गेले. त्यानंतर काहींनी बोकडाला पकडून गावातील एका इसमाच्या घरी बांधून ठेवले. या बोकडाकडे लक्ष नाही, असा समज करुन खाटिकाला बोलावून विकले. पैशावरून वाद होऊ नये यासाठी खाटिकाकडून मिळालेले पैसे आपसात वाटून घेतले. याची महिती होताच भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली. याप्रकरणाची चौकशी करुन दोषीविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे. (वार्ताहर)
नवसाला सोडलेल्या बोकडाला विकण्याचा अधिकार देवस्थान समितीला आहे. समितीने बोकड विकला त्याच्याशी माझा संबंध नाही. किती पैशात विकला याची माहिती नाही. बोकडाचा प्रश्न सोडून विचारा. मंदिर व परिसर स्वच्छ राहावा, यासाठी समितीने तो निर्णय घेतला. नवसासाठी मंदिराच्या बाजूची जागा राखून ठेवली आहे.
-यादोराव कोडापे
अध्यक्ष, देवस्थान समिती, डोंगरदेव.