बाजारसमितीत नियमबाह्य पदभरती

By Admin | Updated: May 9, 2017 00:26 IST2017-05-09T00:26:18+5:302017-05-09T00:26:18+5:30

कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी येथे सन २०१२-१३ मध्ये नियमबाह्य पदभरती करण्यात आली आहे.

Regular reimbursement in the market | बाजारसमितीत नियमबाह्य पदभरती

बाजारसमितीत नियमबाह्य पदभरती

कारवाईस जिल्हा उपनिबंधकांची टाळाटाळ : पत्रपरिषदेत दीपराज इलमकार यांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी येथे सन २०१२-१३ मध्ये नियमबाह्य पदभरती करण्यात आली आहे. याची तक्रार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे देऊनही अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत डॉ. दिपराज इलमकार यांनी केला.
डॉ. इलमकार म्हणाले, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा यांच्या अटी व शर्तीनुसार सन २०१२ -१३ मध्ये एकूण ८ जागा भरणे आवश्यक होते. समितीने जिल्हा सेवा योजना कार्यालय भंडारा, समाज कल्याण कार्यालय भंडारा, आदिवासी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे ६ डिसेंबर २०११ ला पत्र पाठवून कर्मचारी भरती करण्यासाठी वय १८ ते ३० वयोगटाचे निरीक्षक व कनिष्ठ लिपीक या उमेदवारांची यादी सादर करण्यासाठभ पत्र पाठविले. परंतु पेपरमध्ये जाहिरात देताना खुल्या प्रवर्गासाठी वयमर्यादा १८ ते ३३ मागासवर्गीय प्रवर्गाकरीता वयमर्यादा १८ ते ३८ राहिले असे प्रसिद्ध करून शासनाची दिशाभूल केली. बाजार समिती कर्मचारी सेवा भरती नियम ९ अ प्रमाणे ही वयमर्यादा १८ ते ३० व मागासवर्गीय प्रवर्गाकरीता वय मर्यादा १८ ते ३० राहिल असे स्पष्ट नमुद आहे. बाजार समिती कर्मचारी सेवा भरती नियम ९ ब प्रमाणे वर विहित केलेली वयमर्यादा पाच वर्षापर्यंत शिथिल करता येते.
बाजार समितीच्या संचालक मंडळांनी २८ नोव्हंबर २०११ ला ठराव घेवून बाजार समिती लाखनीचे सेवेत असलेल्या अस्थाई, हंगामी कर्मचारी यांना पदवी, संगणक व टायपिंग लागू राहणार नाही, असा ठराव घेवून मंजूर करण्यात आला. त्या ठरावामध्ये वयाच्या अटीबाबत ठराव घेण्यात आला नाही. तो ठराव पणन संचालकाकडून मान्यता प्राप्त करून घेणे गरजेचे असताना सुद्धा त्या ठरावाची मान्यता घेण्यात आली नाही व पदे भरण्यात आली.
निकषाप्रमाणे सहसचिव स्वप्नील गायधने, लेखापाल लोकेश मोटघरे, लिपीक धनंजय बावनकुळे, किशोर भैसारे, विलास मांडवटकर यांची भरती नियमबाह्य झालेली असताना जिल्हा उपनिबंधक भंडारा यांनी ९ ते २०१२ रोजी यास मंजुरी दिली. समितीचे संचालक केशव मांडवटकर हे भरती निवड समितीमध्ये सभासद असताना सुद्धा स्वत:च्या मुलाला विलास मांवटकर यांना नियुक्ती केली, असाही आरोप डॉ. इलमकार यांनी केला आहे.
धनंजय बावनकुळे, किशोर भैसारे, विलास मांडवटकर हे हंगामात रोजंदारीवर काम करीत असल्यामुळे नियमानुसार तीन वर्ष अखंड सेवा केली असा अर्थ अभिप्रेत होत नाही. ते पदवीधर नसून वयातही बसत नव्हते. त्यांच्याकडे मराठी टायपिंग नाही. लोकेश मोटघरे हे निर्धारित वयापेक्षा मोठे होते. त्यांच्याकडे अनुभव नव्हता, असे असतानाही त्यांची भरती करण्यात आली.
पाच जागा या नियमांची पायमल्ली करून गैरमार्गाने भरल्या आहेत. याची तक्रार जिल्हा उपनिबंधक भंडारा, पणन संचालक पुणे, मुख्य सचिव व मंत्री सहकार व पणन यांच्याकडे ३० नोव्हेंबर २०१६ ला रितसर करण्यात आली. मात्र त्यावर अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे. यावेळी विनोद चकोले, शैलेश जांभुळकर उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनीची पदभरती चार वर्षांपुर्वी करण्यात आली होती. डीडीआरच्या नियम व निकषानुसार परीक्षेद्वारे पदभरती करण्यात आली आहे. डीडीआरच्या नेतृत्वात पदभरतीची प्रक्रिया पार पडली असून दीपराज इलमकार वारंवार खोटे आरोप करीत आहेत तसेच प्रशासनाकडे तक्रार करीत असतात. इलमकार यांच्यावर राईसमिलचे शेष शिल्लक आहे. बाजार समितीद्वारे नोटीस पाठविण्यात आले आहे. इलमकार गेल्या पाच वर्षांपासून बाजार समितीच्या विरूद्ध तक्रारी करीत असतात. त्याची चौकशी प्रशासनाकडून होत असते. इलमकार हे "ब्लॅकमेलिंग" करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रसिद्धी माध्यमाद्वारे बाजार समितीची बदनामी करीत आहेत.
-शिवराम गिऱ्हेपुंजे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, लाखनी.

Web Title: Regular reimbursement in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.