संतप्त जमावाचा मृतदेह उचलण्यास नकार
By Admin | Updated: February 21, 2015 00:43 IST2015-02-21T00:43:08+5:302015-02-21T00:43:08+5:30
भंडारा / पवनी / आसगाव : वलनी येथील एका इसमाने गावातीलच १७ वर्षीय तरुणीचा धारदार

संतप्त जमावाचा मृतदेह उचलण्यास नकार
भंडारा / पवनी / आसगाव : वलनी येथील एका इसमाने गावातीलच १७ वर्षीय तरुणीचा धारदार शस्त्राने खून केला. यापूर्वी त्याने छळल्याप्रकरणी तिच्या वडिलाने पवनी पोलिसात त्याची तक्रार केली होती. मात्र, याप्रकरणात पोलिसांनी हयगय केल्यामुळे ही घटना घडली, असा आरोप करुन संतप्त जमावाने एसडीपीओ, ठाणेदार व दोन पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली. या मागणीसाठी नातेवाईक व शिवसैनिकांनी सहा तासपर्यंत मृतदेह उचलू दिला नाही. त्यामुळे वलनीत काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
वलनी येथील शिल्पा जांभूळकर ही आसगांव येथे शिक्षण घेत होती. गावातीलच देवा गभणे याने तिला वाटेत अडवून धारदार शस्त्राने वार करून तिचा निर्दयपणे खून केला. घटनेच्या सहा महिन्यापूर्वी शिल्पाचे वडील रामदास जांभुळकर यांनी त्याच्यापासून त्रास असल्याची पवनी पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्याची हिंमत वाढत गेली. दरम्यानच्या काळात त्याने शिल्पाला अनेकदा त्रास दिला. याप्रकरणी एसडीपीओंनाही निवेदन दिले होते. त्यांनीही हयगय केली, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. घटनेची माहिती होताच शिल्पाचे नातेवाईक व शिवसैनिकांनी घटनास्थळ गाठले. याप्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. अजय तुमसरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिक व संतप्त जमावाने रास्ता रोको केला. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस प्रशासनाने भंडारा येथून दंगा नियंत्रक पथकासह राज्य राखीव दलाला पाचारण केले. यावेळी संतप्त जमावाने या प्रकरणात दोषी असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष कुंभारे, ठाणेदार राजेंद्र नागरे हे दोषी असून त्यांच्यामुळेच शिल्पाचा हकनाक बळी गेल्याचा आरोप केला.
या अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय मृतदेहाला हाथ लावू देणार नाही, अशी भूमिका संतप्त जमावाने घेतल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तब्बल सहा तासानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात आणला. यावेळी डॉ. तुमसरे, अनिल गायधने, यशवंत सोनकुसरे, ललित बोंदरे, दिनेश गजभिये व सुनिल कुरंजेकर व नातेवाईकांनी निलंबनाची मागणी रेटून धरली. रात्री ९ पर्यंत उत्तरीय तपासणी झाली नव्हती. अनुचित प्रकार घडून नये यासाठी रुग्णालय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी / तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)
खून प्रेमातून की वैमनस्यातून?
४आरोपीने शिल्पाचा खून एकतर्फी प्रेमातून केला की वैमनस्यातून केला हे गुढ कायम आहे. शिल्पा ही मैत्रिणीसोबत वलनी येथून सकाळी ७ वाजता घरुन निघाली होती. तिच्यावर पाळत ठेवून देवेंद्र गभणे याने तिला रस्त्यात गाठले. विळयाने वार करुन तिला संपविले. देवेंद्र हा विवाहीत असून त्याला दोन अपत्य आहेत. त्यामुळे शिल्पाचा खून एकतर्फी प्रेमातून की वैमनस्यातून केला, याची पवनी तालुक्यातील वलनी, आसगाव परिसरात चर्चा सुरू आहे.
क्रूरतेचा कळस
४वलनी येथून सायकलने एकटीच जाणाऱ्या शिल्पाला देवेंद्रने वाटेत अडविले. तिला काही कळायच्या आतच त्याने जवळच्या धारदार शस्त्राने तिच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यातही तिने प्रतिकार करीत हाताने वार झेलण्याचा प्रयत्न केला. यावेळी मनोविकृतीचा कळस गाठलेल्या आरोपीचे तिच्या हाताची बोटे छाटली. शिल्पाच्या मानेवर, छातीवर, पोटावर त्याने अनेक वार केले. रक्ताच्या थारोळ्यातच तिने जगाचा निरोप घेतला. अशा क्रुर मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जमावातून उमटू लागली आहे.
घटनेचा सखोल तपास सुरू
मृतक शिल्पा व आरोपी देवेंद्र यांच्यामध्ये मामा - भाची असे नाते आहे. ग्रामपंचायतच्या चाळीत शिल्पाच्या आईचे कापडाचे दुकान आहे. खरेदी केलेल्या कापडाची ४८५ रुपये उधारी आरोपीकडे आहे. त्यामुळे त्यांच्यात वादविवाद व्हायचे. २२ सप्टेंबर रोजी झालेला वाद महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीसमोर समन्वयातून सोडविण्यात आला. त्याचा राग अनावर झाल्याने त्याने अमानूष पद्धतीने मुलीवर हल्ला केला असावा, असा अंदाज प्राथमिक तपासात दिसून येत आहे. तरीसुद्धा या प्रकरणातील बारकावे तपासण्यात येत आहे.
- कैलास कणसे,
जिल्हा पोलिस अधीक्षक, भंडारा