ग्रामपंचायतीचे कुलूप उघडण्यास नकार
By Admin | Updated: June 19, 2015 01:03 IST2015-06-19T01:03:06+5:302015-06-19T01:03:06+5:30
मोहाडी तालुक्यातील खडकी येथे तंटामुक्त गाव समितीची बैठक १५ जून रोजी ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित केलेली होती.

ग्रामपंचायतीचे कुलूप उघडण्यास नकार
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील खडकी येथे तंटामुक्त गाव समितीची बैठक १५ जून रोजी ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित केलेली होती. बैठकीचे नोटीस ग्रामपचांयत शिपायांमार्फत सर्वांना पाठविण्यात आले. बैठकीची वेळ झाली,पदाधिकारी हजर झाले, मात्र शिपाई ग्रामपंचायतीचे कुलूप उघडण्यास तयार नव्हता. गावात असून, अनेकदा बोलावणे पाठवूनही दोन्ही शिपायांनी ढुंकूनही पाहिले नाही. पदाधिकारी दोन तास वाट पाहून परतले. प्रकरणी ग्रामसेवक व परिचरांची तक्रार करण्यात आली.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात १५ जून रोजी सकाळी ११ वाजता समिती अध्यक्ष रामदास धुर्वे यांचे अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. बैठकीचे नोटीस परिचरामार्फत पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. त्यासाठी परिचरांना प्रती बैठक दिडशे रुपये स्व:खिश्यातुन दिले जातात, असे अध्यक्ष धुर्वे यांनी सागितले.
बैठकीची वेळ झाली, अध्यक्षांसह पदाधिकारी नियोजित वेळेवर ग्रामपंचायत कार्यालयात हजर झाले. परिचरांनी ग्रामपचांयतचे कुलूप उघडलेले नव्हते. दोन्ही परिचर कुठे गेले म्हणून शोधाशोध सुरु झाली. फोन लावला गेला, परिचरांनी गावातील टोलीवर असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी ग्रामपंचायतला येण्यास नका दिला. कुलूप उघडण्यासही मनाई केली. तब्बल दोन तास पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर वाट पाहिली मात्र परिचर फिरकले नाही. समितीवर जणू बहिष्कार टाकल्यासारखी अवस्था दिसत होती. निवडणुकीची आचार संहिता सुरु असल्याचे कायदा आपल्या हातात, अश्याच तोऱ्यात ते वावरले.
ग्रामसेवक अश्विन डोहळे यांच्या दुर्लक्षित धोरणांचा व कारभाराचा पाढा पदाधिकाऱ्यांकडून वाचला गेला. डोहळे ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी असून त्यामुळेच त्यांच्या बेजबाबदार कारभाराची चौकशी केली जात नाही, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रकरणी खंड विकास अधिकारी मोहाडी यांचेकडे तक्रार करण्यात आली. (वार्ताहर)