सव्वादोन लाख पशुधनाची घट
By Admin | Updated: October 4, 2015 01:18 IST2015-10-04T01:18:18+5:302015-10-04T01:18:18+5:30
जिल्ह्यातील बहुतांश नागरीकांचा मुख्य व्यवसाय शेतीसह गोपालन करणे आहे.

सव्वादोन लाख पशुधनाची घट
आज जागतिक पशु दिन : पशु दवाखाने ‘आॅक्सिजन’वर, कामांचा खेळखंडोबा
देवानंद नंदेश्वर भंडारा
जिल्ह्यातील बहुतांश नागरीकांचा मुख्य व्यवसाय शेतीसह गोपालन करणे आहे. परंतु, निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे शेतकरी होरपळत असताना त्यांचा गोपालनाच्या माध्यमातून उदरनिर्वाह सुरु आहे. मात्र अलिकडे जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणारे पशु दवाखाने आॅक्सीजनवर असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी २००७ च्या पशुगणनेच्या तुलनेत २०१२ च्या गणनेत पशुधनांच्या संख्येत २ लाख ११,२३० ने घट झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अखत्यारीत एकूण ८५ दवाखाने आहेत. यात ३२ दवाखाने हे जिल्हा पशुसंवर्धन पशु उपआयुक्त यांच्या अखत्यारीत तर ५३ दवाखान्यावर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे नियंत्रण आहे.
भंडारा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयातंर्गत ३२ दवाखाने आहेत. या उपआयुक्त कार्यालयाच्या कामासाठी जिल्ह्यात ११९ पदांना मंजूरी असली तरी यातील ३६ पदे रिक्त आहेत. सध्यास्थितीत ८३ पदे भरलेली आहेत. रिक्त पदांमध्ये ४ पशुधन विकास अधिकारी, ७ सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, १२ परिचर, ३ व्रणोपचारक, पर्यवेक्षक व वरिष्ठ लिपिकांची प्रत्येकी दोन, तर अधिक्षक, लघुलेखक, वरिष्ठ सहायक, वाहन चालक, नाईक व शिपाईची प्रत्येकी एक पद रिक्त आहे. हीच परिस्थिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाची आहे. या विभागाकडून रिक्त पदांची माहिती मात्र कळू शकली नाही. जिल्ह्यातील अनेक दवाखान्यात वरिष्ठ लिपीक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व परिचारांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कामांचा खेळखंडोबा होत असून जनावरांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे.
भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अखत्यारीत एकूण ८५ दवाखाने आहेत. यात ३२ दवाखाने हे जिल्हा पशुसंवर्धन पशु उपआयुक्त यांच्या अखत्यारीत आहे.
यात श्रेणी १ चे १७ व श्रेणी २ चे १५ दवाखाने आहेत. ५३ दवाखान्यावर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे नियंत्रण आहे. यात श्रेणी १ चे १९, श्रेणी २ चे ३३ व एक फिरते चिकित्सालय आहे. जिल्ह्यात १ जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, ५ तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, १ जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, १ पशुधन तपासणी नाका असून ते साकोली येथे आहे. श्रेणी १ चे ११ राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाने, श्रेणी २ चे १५ राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाने, जिल्हा परिषदचे श्रेणी १चे १९ तर, श्रेणी २ चे ३३ दवाखाने आहेत. एक फिरत पशुचिकित्सालय आहे.
दर पाच वर्षांनी होते पशुगणना
पशुंची जनगणना दर पाच वर्षांनी होत असून २००७ च्या पशुगणनेच्या तुलनेत २०१२ च्या गणनेत पशुधनांची संख्या २ लाख ११ हजार २३० ने घट झाली आहे. सन २०१२ मध्ये १९ वी च्या पशुगणना जाहिर करण्यात आली. त्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३ लाख ४८ हजार १०७ पशुधन होते. यात गायींची २ लाख ३८ हजार ७७४ आहे. यामध्ये ८१ हजार ९२२ संकरीत व १ लाख ५६ हजार ८४१ गावठी गायींचा समावेश आहे. तसेच म्हैस ९० हजार १६१, शेळ्या १ लाख ६१ हजार ५२८, मेंढ्या २ हजार ६८४, कोंबड्या २ लाख ७० हजार २५९, बदके ३२९, डुकरे २४९, घोडे २३, कुत्रे १० हजार ३५६ एवढे आहेत. सन २००७ च्या पशुगणनेप्रमाणे जिल्ह्यात ५ लक्ष ५९ हजार ३३७ पशुधन होते. याशिवाय कुक्कुटवर्गिय पक्षांची संख्या २ लक्ष ९२ हजार ६९० होती. या गणनेनुसार एकूण पशुधनापैकी गाय, बैल ४७ टक्के, म्हशी व रेडे १७ टक्के, शेळ्या, मेंढ्या ३७ टक्के , घोडे व सिंगरे ०.०२ व इतर पशुधन ०.१ टक्के होते.