तालुका क्रीडा संकुल समितीची पुनर्रचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 00:46 IST2016-03-04T00:46:21+5:302016-03-04T00:46:21+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात विभागीय, जिल्हा व तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करण्याची योजना सन २००३ च्या शासननिर्णयाद्वारे कार्यान्वित करण्यात आली

तालुका क्रीडा संकुल समितीची पुनर्रचना
तहसीलदार कार्याध्यक्ष : आता आमदार राहणार अध्यक्ष
अशोक पारधी पवनी
संपूर्ण महाराष्ट्रात विभागीय, जिल्हा व तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करण्याची योजना सन २००३ च्या शासननिर्णयाद्वारे कार्यान्वित करण्यात आली. तेव्हापासून क्रीडा संकुलाची उभारणी स्वतंत्र व नोंदणीकृत क्रीडा संकुल समितीमार्फत होत आहे. मात्र तालुका क्रीडा संकुल समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून स्थानिक आमदार या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत.
तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आमदार राहणार असून तहसीलदार कार्याध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. नऊ सदस्यीय समितीमध्ये सदस्य म्हणून संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती यांचा प्रतिनिधी किंवा अधिकारी, गटविकास अधिकारी, उपसअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, महानगरपालिका अथवा त्यांचे प्रतिनिधी, गटशिक्षण अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका क्रीडा अधिकारी अथवा संबंधित क्रीडा अधिकारी, राज्य क्रीडा मार्गदर्शक सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. सदर समितीवर आमंत्रीत सदस्य म्हणून शारीरिक शिक्षण शिक्षक व तालुका क्रीडा मंडळाच्या प्रत्येकी एक प्रतिनिधी, तालुका मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षक संघटना प्रतिनिधी तसेच तालुक्यातील राष्ट्रीय राज्य पातळीवर खेळाडूंचा एक प्रतिनिधी राहणार आहे. पुनर्रचीत समिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालयाकडे संपर्क साधून कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे.
नव्याने निर्गमित शासन निर्णयाद्वारे समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आलेली आहे. क्रीडा सुविधांचा विचार करून एक वर्षाच्या कालावधीमध्ये क्रीडा संकुल उभारणी करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करणे व अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आमदार विकास निधी व अन्य आर्थिक स्त्रोत निर्माण करणे, उपलब्ध क्रीडा विषयक सुविधांचा महत्तम वापर करण्याचा तसेच क्रीडा संकुलाची देखभाल दुरुस्ती संदर्भात क्रीडा संकुलामध्ये आवश्यकतेनुसार केअरटेकर नियुक्त करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, तालुका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयामधील जास्तीत जास्त विद्यार्थी तालुका क्रीडा संकुलाचा वापर करतील असा प्रयत्न करणे, तसेच शालेय व अन्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे अशा प्रकारची जबाबदारी पुनर्रचित तालुका क्रीडा संकुल समितीकडे सोपविण्यात आलेली आहे.
शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी समितीचे अध्यक्ष व जिल्हा क्रीडा अधिकारी यांची असल्याने भविष्यात उत्तम खेळाडू निर्माण करण्यासाठी तालुका क्रीडा संकुल मैलाचा दगड ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)