आरोग्य केंद्र परिचारिकेच्या भरवशावर
By Admin | Updated: September 27, 2014 23:10 IST2014-09-27T23:10:29+5:302014-09-27T23:10:29+5:30
लक्षाधीश रुपये खर्च करून मोहदुरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी भव्य इमारत तयार करण्यात आली. सर्व सोयीयुक्त असे आरोग्य केंद्र तर तयार झाले. मात्र त्यामाने याठिकाणी रुग्णांना पाहिजे

आरोग्य केंद्र परिचारिकेच्या भरवशावर
मोहदुरा : लक्षाधीश रुपये खर्च करून मोहदुरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी भव्य इमारत तयार करण्यात आली. सर्व सोयीयुक्त असे आरोग्य केंद्र तर तयार झाले. मात्र त्यामाने याठिकाणी रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात योग्य सेवा मिळत नाही. नाव मोठे दर्शनखोटे याप्रमाणे येथील आरोग्य केंद्राची अवस्था आहे. याठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर फक्त ओपीडी पुरतेच हजर राहतात. रात्रीला मात्र डॉक्टरांचा थांगपत्ताच नसतो. रात्रीला येणाऱ्या इमरजन्सी रुग्णांची मात्र गैरसोय होत असते. रुग्णांना आल्यापावली परत जावे लागते.
मोहदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच उपकेंद्र येतात. यामध्ये सिरसी, कोथुर्णा, मोहदुरा, दाभा व गणेशपूरचा समावेश आहे. तसेच २९ गावे आणि ६० हजाराच्या जवळपास नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे मोहदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुख्य केंद्र आहे. परंतु येथील आरोग्य केंद्र शोभेचे असून नागरिकांना वेळेवर उपचार करण्यास येथील डॉक्टर असमर्थ ठरत आहेत.
येथील आरोग्य केंद्रात एकूण चार परिचर कार्यरत आहेत. यापैकी तीन महिला परिचर आहेत. दिवसा एक पुरुष परिचर व एक महिला परिचर राहते. रात्रीला फक्त हिला परिचर आपले कर्तव्य बजावत असतात. रात्रीला इतर महिला परिचराव्यतिरिक्त याठिकाणी इतर कर्मचारी तसेच डॉक्टर कुणीच राहत नाही. अनेकदा रात्रीला भेट दिली असता डॉक्टरसाहेब वैगेरे कुणीच नाही, असे सांगितले जाते. गावात आरोग्य केंद्र असून गावातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. यापेक्षा दुसरे दुर्देव्य कोणते. पण याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना आरोग्य विभागाचे. परंतु या सगळ्यामध्ये गरीब नागरिकांचे मात्र मोठे नुकसान आहे. रुग्णांच्या खासगी दवाखान्यात जाण्यास पर्यायच उरत नाही. अशातच नागरिकांच्या मनात रोष दिसून येते.