खरे लाभार्थी वाऱ्यावर, श्रीमंतांना मिळाले घरकूल!
By Admin | Updated: May 8, 2017 00:23 IST2017-05-08T00:23:27+5:302017-05-08T00:23:27+5:30
मोहाडी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील ‘ब’ पात्र लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत.

खरे लाभार्थी वाऱ्यावर, श्रीमंतांना मिळाले घरकूल!
प्रधानमंत्री आवास योजना : प्रत्येक गावात संयुक्त चौकशी गरजेची
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील ‘ब’ पात्र लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. गरजवंत, निराधार व बेघर लोकांची नावे सुटलेली असून काहींची नावे यादीत खूप मागे ३ ते ४ गुणांकात आहेत.
गर्भश्रीमंताची नावे शुन्य गुणांकात दाखविलेली असून पहिल्या प्राधान्यक्रमात समाविष्ट आहेत. घरकुलाचे लाभ देण्याचे काम प्रशासनाचे वतीने सुरु झालेले आहे. गरीबांवर मात्र, त्यामुळे अन्याय होत असून ‘ब’ यादीतील लाभार्थ्यांची फेर चौकशीसाठी संबंधित विभागाचा अभियंता, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील लोकांची संयुक्त समिती तयार करुन चौकशी करण्याची मागणी मोहाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वासुदेव बांते यांनी केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना कल्याणकारी योजना आहे. गावातील कोणताही गरीब पक्या घरापासून वंचित राहू नये त्याचे जीवनमान उंचवावे ही त्यामागची निर्मळ भावना आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची निवड सन २०११ मधील आर्थिक व सामाजिक सर्व्हेक्षणावरुन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाचे वतीने देण्यात येत आहे. मात्र, यादीत मोठ्या प्रमाणात घोळ आहेत.
प्रत्येक गावातील गरजवंत, गरीब व बेघरावर त्यामुळे अन्याय होत आहे. यादीत मोठ्या प्रमाणात श्रीमंतांचा भरणा आहे. त्यांचे गुणांक शुन्य दाखविण्यात आल्याने पहिल्या पात्र लाभार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. गरीब व बेघरांची नावे या यादीत दिसून येत नाही. ज्या गरजवंताची नावे आहेत. त्यांची नावे ३ ते ४ गुणांकात दाखविण्यात आल्याने अन्याय झाल्याची भावना मोहाडी तालुक्यात आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत नावे नसलेल्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी अपील करण्याचे प्रावधान असतांना, नागरिकांनी तसे अपील ग्रामसेवकांकडे दाखल केलेले असताना ग्राम सेवकांनी त्यांचे अपील वरिष्ठांकडे पाठविलेले नाहीत. ज्यांनी पाठविली, त्यांच्या अपीलावर खंडविकास अधिकाऱ्यांकडून सुनावणी झालेली नाही. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील सर्वच गावात भोंगळ कारभार सुरु आहे. या योजनेतील ‘ब’ पात्र लाभार्थ्यांना यादीतील अनुक्रमानुसार लाभ देण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे. लाभार्थ्यांचे अनुदानही तालुक्यांना प्राप्त झालेले असून लक्षांकानुसार कामे सुरु करण्याचा सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे गर्भ श्रीमंतानी सिमेंटच्या मजबुत घरावर दुसऱ्या मजल्याचे काम सुरु केले. असून गरीबांत असंतोषाचे वातावरण दिसून येत आहेत.
मोहाडी तालुक्याच्या आमसभेत सर्वच गावातील सरपंच व उपसरपंचांनी याद्यावर आक्षेप घेतला. ब यादीत समाविष्ट नसलेल्या ड यादीतील गरजुंची नावे ब यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली. यामुळे आ. चरण वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, खंड विकास अधिकारी तसेच जि.प. व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
सुनावणी घेण्याचे आश्वासन खंड विकास अधिकाऱ्यांनी दिले. पंरतु अद्यापही कार्यवाही सरुु झालेली नाही. खंड विकास अधिकाऱ्यांनी सुनावणी घेण्याअगोदर पात्र व अपात्र लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी गावात संयुक्त चौकशी समिती नेमण्याची गरज आहे. त्यात क्षेत्राचे जि.प. सदस्य व पं.स. सदस्य, संबंधित विभागाचा अभियंता, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिकांचा समावेश करण्यात यावा. गरीब व गरजवंत, बेघर लाभार्थ्यांची नावे प्राधान्यक्रमात यादीत समाविष्ट करुन लाभ देण्यात यावा, अशी मागणी मोहाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वासुदेव बांते यांनी केली आहे.