वाचन प्रेरणा दिन दप्तरमुक्त दिन म्हणून होणार साजरा
By Admin | Updated: October 14, 2016 03:35 IST2016-10-14T03:35:01+5:302016-10-14T03:35:01+5:30
मुलांना वाचनाची नियमित सवय व गोडी लागावी यादृष्टीने शासनाने १५ आॅक्टोंबर हा माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन

वाचन प्रेरणा दिन दप्तरमुक्त दिन म्हणून होणार साजरा
मुलांना वाचनाची गोडी लावणार : समाजातील सर्व घटकांचा सहभाग
भंडारा : मुलांना वाचनाची नियमित सवय व गोडी लागावी यादृष्टीने शासनाने १५ आॅक्टोंबर हा माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी हा दिवस वाचन प्रेरणा दप्तरमुक्त दिवस म्हणून साजरा करायच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. अशा आशयाचे परिपत्रक शिक्षण अधिकारी प्राथमिक जि. प. भंडारा यांनी सर्व शाळांना पाठविले आहे.
१५ आॅक्टोंबर या दिवशी इयत्ता बारावी पर्यंतच्या प्रत्येक मुलामागे किमान दहा छोटी पुस्तके ( १६ पानी ) वाचावित असे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक शाळेत पर्याप्त संख्येने मुलांच्या वयानुरुप वाचनोपयोगी पुस्तके उपलब्ध ठेवावीत. प्रत्येक तालुक्यात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करावे. सर्व घटकांना सहभागी करुन घ्यावे व जिल्ह्यातील सर्व शाळांना पुरेशा प्रमाणात पुस्तकांच्या उपलब्धतेबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वाचन प्रेरणा चळवळ रुजविण्यासाठी मुलांना वयानुरुप पुस्तक उपलब्ध करुन द्यावीत. एखाद्या शाळेत पुस्ताकांची संख्या जास्त असेल त्या शाळांनी कमी पुस्तके असणाऱ्या शाळांना वाचन प्रेरणा दिवसासाठी ती उपलब्ध करुन द्यावीत. बोलीभाषेची पुस्तके आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन द्यावीत. वाचन प्रेरणा दिवसाच्या पूर्वी पुस्तक दिंडीचे आयोजन करण्यात यावे. नागरिक, पालक, शिक्षणप्रेमी यांच्याकडून पुस्तके, देणगी स्वरुप मिळवावीत, असेही त्यात म्हटंले आहे. संगणक-टॅबलेट इत्यादीवर आॅनलाईन पध्दतीने अधिकृत अॅप्सद्वारे मुलांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात यावीत. या उपक्रमात समाजातील सर्व घटकांना सहभागी करुन घ्यावे, असे डायटचे प्राचार्य अभय परिहार यांनी कळविले आहे. वाचन प्रेरणा दिवशी कोणतेही धार्मिक ग्रंथ त्यावर आधारित मुल्य शिक्षणाची पुस्तके, विवादित पुस्तके, भितीपत्रके, आक्षेपार्ह मजकूर आदी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येवू नये, अशा शासनाच्या सूचना आहेत. (नगर प्रतिनिधी)