योजनेचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा
By Admin | Updated: October 13, 2016 00:53 IST2016-10-13T00:53:28+5:302016-10-13T00:53:28+5:30
नवरात्र हा स्त्री शक्तीचा जागर करण्याचा काळ असून स्त्री शक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

योजनेचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा
पटोले यांचे प्रतिपादन : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ
भंडारा : नवरात्र हा स्त्री शक्तीचा जागर करण्याचा काळ असून स्त्री शक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे प्रारुप तळागाळातील कष्टकरी महिलांसाठी तयार केले. महिला दिवसभर कुटूंबासाठी राबते. स्वयंपाक करतांना निघणाऱ्या धुराचा सर्वाधिक जास्त महिलांना सहन करावा लागतो. त्याच्या दुष्परिणामामुळे महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. या बाबींचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलासाठी उज्वला योजना सुरू केली. या योजनेचा शेवटच्या कुटूंबास लाभ मिळाला पाहिजे, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.
प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत नवीन लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वाटपाचा शुभारंभ खासदार नाना पटोले यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, इंडेन गॅस कंपनीचे क्षेत्रीय प्रबंधक पी.सी. काटकर, पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, उद्योगपती सुनिल मेंढे, माजी सभापती कलाम शेख, भाजपचे महामंत्री भरत खंडाईत, नगरसेवक सुर्यकांत इलमे, विकास मदनकर, डी.एफ कोचे उपस्थित होते.
यावेळी खा. पटोले म्हणाले, आता सर्वसामान्यांसाठी अच्छे दिन आले आहेत. या योजनेत केवळ १०० रुपयांचा एक स्टॅम्पपेपर भरून सर्व बीपीएल धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. पहिल्या टप्प्यात ३३ हजार ६१ लाभार्थ्यांनी अर्ज भरले. इण्डेन, हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत गॅस कंपन्यांनी अडचणीविना लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर द्यावे. ज्या कंपन्या यात हयगय करतील, त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात येईल. कंपन्यांनी या योजनेचा प्रचार व प्रसार करावा. कंपन्यांकडून हयगय होणार नाही, याकडे जिल्हा पुरवठा अधिकऱ्यांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. कंपन्यांनी होर्डिंग्ज व बॅनर व इतर मार्गांनी या योजनेचा प्रचार व प्रसार करावा. ज्या बीपीएल धारकांजवळ गॅस कनेक्शन नाही, त्या प्रत्येकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कंपन्यांना यानिमित्ताने चांगली संधी मिळाली आहे. म्हणून त्यांनी जास्तीत जास्त ग्राहकांना या योजनेचा लाभ द्यावा.
आमदार चरण वाघमारे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गरिबातील गरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. महिलांचे आरोग्य खराब होऊ नये यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना गावागावातील सर्व कुटूंबापर्यंत पोहचविण्याचे काम कंपन्याचे आहे. या योजनेतसाठी कुटूंबातील महिला ही कुटूंबप्रमुख आहे. परंतु एखाद्या कुटूंबात कर्ती महिला नसेल तर १८ वर्षावरील कुटूंबातील मुलीलासुध्दा कुटूंब प्रमुख करुन या योजनेचा लाभ घेता येते. नागरिक अनेक योजनेसाठी पात्र आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात पी.सी. काटकर यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेचे महत्व सांगितले. या योजनेअंतर्गत ५ कोटी एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचा संकल्प आहे. प्रत्येक कुटूंबाच्या महिला प्रमुखाद्वारे ही योजना राबविली जाते. यात स्वेच्छेने ग्राहक शेगडी घेऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार नाना पटोले यांच्याहस्ते इण्डेन, हिंदुस्थान पेट्रोलिमय व भारत गॅस कंपन्यांच्या नवीन लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित कंपनीत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यावेळी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)