हटविलेल्या अतिक्रमित जागेवर पुन्हा अतिक्रमण
By Admin | Updated: July 26, 2014 23:58 IST2014-07-26T23:58:25+5:302014-07-26T23:58:25+5:30
येथील दिवसेंदिवस वाढत असलेला अतिक्रमण ग्रामपंचायतने लक्षात घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली यात बाजार चौक, स्मशानभूमी, ढोरफोडी व रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण हटविले.

हटविलेल्या अतिक्रमित जागेवर पुन्हा अतिक्रमण
चिचाळ : येथील दिवसेंदिवस वाढत असलेला अतिक्रमण ग्रामपंचायतने लक्षात घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली यात बाजार चौक, स्मशानभूमी, ढोरफोडी व रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण हटविले. मात्र ढोरफोडी व बाजार चौकात पुन्हा अतिक्रमण केल्याने मेलेल्या जनावरांना कुठे टाकावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पवनी तालुक्यातील चिचाळ हे पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. चिचाळला जिल्हा परिषद व पंचायत समिती असे दोन क्षेत्र आहेत. अनेकदा या गावाला जि.प. व पं.स. ची दोन्ही पदे भुषविली आहेत. मात्र २० वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण, बाजारचौकातील वाढलेले अतिक्रमण स्मशानभूमी, ढोरफोडीमध्ये अतिक्रमण करुन केलेली शेती व माळरान जागेवरील अतिक्रमण केल्याने पाळीव जनावरांना चराईसाठी जागा शिल्लक राहिली नाही. ढोरफोडी जागेवर एका अतिक्रमणधारकाने ३ ते ४ एकर शेती तोडल्याने मेलेली जनावरे रस्त्यावर व काहींनी स्मशानभूमीत टाकीत होते. मात्र ग्रामपंचायतने टोकाची भूमिका घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबवून गावनाते संबंध बाजूला ठेवून बाजारातील अतिक्रमण, स्मशानभूमीतील व ढोरफोडी जागेवरील अतिक्रमण व पाळीव जनावरांच्या चराईच्या जागेवर शेतीचे सपाटीकरण करण्यात आले.
पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने ढोरफोडी येथे हटविण्यात आलेला अतिक्रमण पुन्हा केल्याने मेलेल्या जनावरांना कुठे टाकावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ढोरफोडी जागेवर अतिक्रमण केल्याने तो दुसरीकडे त्यांची विल्हेवाट लावली तर कुणीही आपल्या हद्दीजवळ टाकण्यास मनाई करीत आहेत. त्यामुळे त्यांनी जनावरे नेण्याचे बंदच केले. त्यामुळे येथील जनता मिळेल त्या ठिकाणी मेलेले जनावरे टाकीत असून सर्वत्र दुर्गंधी पसरवित आहेत.
ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन ढोरफोडीत जावे व मेलेले जनावरे येथे टाका असे त्या अतिक्रमण धारकाला सांगल्यास संबंधित इसम जनावरे नेण्यास तयार असल्याचे लोकमतजवळ सांगितले.(वार्ताहर)