रेशनचे तांदूळ गोळा करणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:40 IST2021-09-12T04:40:52+5:302021-09-12T04:40:52+5:30
गरीब व गरजू लाभार्थ्यांना शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ दिले जातात. यात तांदूळ लाभार्थ्यांकडून खरेदी करणारी टोळी ...

रेशनचे तांदूळ गोळा करणारी टोळी सक्रिय
गरीब व गरजू लाभार्थ्यांना शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ दिले जातात. यात तांदूळ लाभार्थ्यांकडून खरेदी करणारी टोळी तुमसर तालुक्यात व शहरात सक्रिय झाली आहे. ही टोळी लाभार्थ्याच्या घरी जाऊन तांदूळ १६ ते १७ रुपये किलोग्रामप्रमाणे खरेदी करीत आहे. अनेक लाभार्थ्यांना तांदूळ हे स्वस्त धान्य दुकानातून विनामूल्य मिळत आहेत. तर काही लाभार्थ्यांना नाममात्र शुल्कात तांदूळ मिळतो. असा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. लाभार्थ्यांकडून शहर व गावात तांदूळ जमा करणारी टोळी ही ठोक भावाने विक्री करीत असल्याचे समजते.
एका टोळीत दोन ते तीन लोकांपासून ते दीडशे ते दोनशे किलोग्राम तांदूळ लाभार्थ्यांकडून गोळा करतात. त्यांना प्रति किलोग्रामवर तीन ते चार रुपये मिळतात. पुढे हा तांदूळ ठोक भावाने विक्री केला जातो. परंतु हा तांदूळ खरेदी करणारे कोण आहेत हा संशोधनाचा विषय आहे. हा तांदूळ नंतर कुठे जातो व कोणाला विक्री केला जातो हे एक न उलगडणारे कोडे आहे. हा प्रकार अनेक महिन्यांपासून येथे सुरू असल्याची माहिती आहे. प्रशासनाला सर्व प्रकार माहीत नसावा याची शक्यता अगदी कमी आहे. गावापासून तर ते तालुक्यापर्यंत असा हा गोरखधंदा मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. परंतु प्रशासनाने येथे अद्यापपर्यंत कारवाई केली नाही.
बॉक्स
तांदूळ विक्री करणारे लाभार्थी कोण?
स्वस्त धान्य दुकानातून विनामूल्य मिळणारा तांदूळ अथवा अल्प दराने मिळणारा तांदूळ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. त्यांना तांदळाची गरज नसतानाही त्यांना या योजनेचा फायदा कोणी दिला हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे यात बोगस लाभार्थ्यांची संख्या अधिक दिसून येते. शासकीय योजनेचा बोजवारा उडत असताना प्रशासनाचे येथे कायम दुर्लक्ष दिसत आहे. तांदूळ विकणारे रॅकेट येथे सक्रिय असल्याचे बोलले जाते. परंतु अजूनपर्यंत त्यावर ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे हा प्रकार सर्रास राजरोसपणे सुरू आहे. ऑनलाइनच्या काळात भ्रष्टाचाराला वाव मिळेल असे गृहीत धरण्यात आले होते. परंतु त्यातही गोरखधंदा करणाऱ्यांनी संशोधन करून मार्ग काढण्यात आल्याचे दिसून येते.