शिधापत्रिकाधारकांची दिवाळी ‘गोड’
By Admin | Updated: October 21, 2014 22:45 IST2014-10-21T22:45:45+5:302014-10-21T22:45:45+5:30
दिवाळीचा आनंदोत्सव सर्वत्र मोठ्या धुमधळाक्यात साजरा करण्यात येतो. सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी प्रशासनाने बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी साखर उपलब्ध केली आहे.

शिधापत्रिकाधारकांची दिवाळी ‘गोड’
भंडारा : दिवाळीचा आनंदोत्सव सर्वत्र मोठ्या धुमधळाक्यात साजरा करण्यात येतो. सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी प्रशासनाने बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी साखर उपलब्ध केली आहे. दिवाळी असल्याने प्रती व्यक्ती ६६० ग्रॅम साखरचे वाटप करण्यात येणार असून १६० ग्रॅम साखर अतिरिक्त वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी ४ हजार ८२० क्विंटल साखर प्राप्त होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ७ लाख २८ हजार ७१७ लाभार्थ्यांना मिळणार आहे.
अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना राशनचे वाटप राशन दुकानाच्या माध्यमातून करण्यात येते. जिल्ह्यात बीपीएल व अंतोदय शिधापत्रिकाधारकांना तांदुळ व गहुचे नियमित वाटप करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून साखरेचे वाटप बंद करण्यात आले होते. मात्र ते पुर्ववत सुरू करण्यात येत आहे. शिधापत्रिकाधारकांना नियमित ५०० ग्रॅम साखर वाटप करण्यात येते. मात्र दिवाळी असल्याने प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना १६० ग्रॅम जादा साखर वाटप करण्याचे आदेश पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राशन दुकानदारांना दिले आहे.
जिल्ह्यातील अनेकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभ मिळावा, यासाठी राशनकार्डची जोडणी केली होती. मात्र त्यातील १० हजार ४४८ राशनकार्ड धारकांचे उत्पन्न जास्त असल्याने त्यांना या योजनेचा लाभधारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. जिल्ह्यात ७ लाख २८,७१७ बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. यात बीपीएल ४ लाख ३८,६९० तर अंतोदयचे ३ लाख ४९५ लाभार्थी आहेत. या सर्वांना तांदुळ, गहू व साखरेचे वाटप करण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)