लेखी आश्वासनानंतर 'रास्ता रोको आंदोलन' रद्द

By Admin | Updated: January 21, 2016 00:52 IST2016-01-21T00:52:09+5:302016-01-21T00:52:09+5:30

सानगडी येथील शौचालय बांधकाम भ्रष्टाचार प्रकरणी सुरू असलेले उपोषण लेखी आश्वासनामुळे मागे घेऊन 'रास्तारोको' आंदोलन रद्द करण्यात आले आहे.

'Rasta Roko agitation' canceled after written assurances | लेखी आश्वासनानंतर 'रास्ता रोको आंदोलन' रद्द

लेखी आश्वासनानंतर 'रास्ता रोको आंदोलन' रद्द

साकोली : सानगडी येथील शौचालय बांधकाम भ्रष्टाचार प्रकरणी सुरू असलेले उपोषण लेखी आश्वासनामुळे मागे घेऊन 'रास्तारोको' आंदोलन रद्द करण्यात आले आहे.
सबंधितांवर कारवाई करण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यात ५ जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतरही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर मंगळवारी 'रास्तारोको' आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता. मात्र, या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासन आंदोलनकर्त्यांसमोर झुकले व सबंधितावर कारवाई करण्याच्या आदेशाचे लेखीपत्र खंडविकास अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन सादर केले. या प्रकरणातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई न केल्यास प्रकरण उच्च न्यायालयात(जनहित याचिकेतून) दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
सानगडी येथील शौचालय बांधकामात करण्यात आलेल्या भ्रष्ट्राचाराविरुद्ध १९ जानेवारीला सबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी सानगडी येथील संत गजानन महाराज चौकात उपोषणकर्त्यांच्या सर्मथनार्थ 'रास्तारोको' होणार होते. परंतु, पंचायत समिती साकोली येथून वरिष्ठांचे आदेश घेवून येत असून आपण आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती खंडविकास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यानंतर दुपारी खंडविकास अधिकारी शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी टेंभरे, वाघमारे, व्ही.पी.मुंडे, ठाणेदार धुसर, नायब तहसीलदार खोत यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. या भेटीत उपोषणकर्ते व सर्मथनार्थ असलेले आंदोलक यांचेशी चर्चा करण्यात आली.
यावेळी चर्चेतून खंडविकास अधिकारी यांनी सानगडी ग्रामपंचायतचे सरपंच यांचेविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९(१) अन्वये कारवाई करण्यात आली असून, विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी अहवाल सादर केला आहे. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांचेविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित असल्याचे लेखी पत्र सादर केले. याशिवाय ज्या ११ लाभार्थ्यांच्या बनावट स्वाक्षरी, अंगठे करून निधी उचल करण्यात आली, त्यांचेविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच विद्यमान ग्रामविकास अधिकारी रंगारी यांना या ग्रामपंचायतमधून हटवित असल्याचे पत्र देण्यात आले. त्यामुळे मंगळवारी करण्यात येणारे 'रास्ता रोको' आंदोलन रद्द करण्यात आले.
उपोषणकर्ते राजकुमार जनबंधू, कुंडलीक जनबंधू यांना लिंबूपाणी पाजून त्यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली. १५ दिवसात कारवाई न केल्यास प्रकरण उच्च न्यायालात दाखल करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच अविनाश रंगारी, कृबासचे संचालक केशवराम मांडवटकर, प्रल्हाद धकाते, जगदिश गडपायले, धनराज साखरे यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 'Rasta Roko agitation' canceled after written assurances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.