धान पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: August 8, 2015 00:47 IST2015-08-08T00:47:44+5:302015-08-08T00:47:44+5:30
पावसाच्या खंडीतपणामुळे धानपीक संकटात आले आहे. धान पिकाला पोषक हवामान नसल्याने धान रोगाच्या विळख्यात सापडले आहे.

धान पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव
पालांदूर : पावसाच्या खंडीतपणामुळे धानपीक संकटात आले आहे. धान पिकाला पोषक हवामान नसल्याने धान रोगाच्या विळख्यात सापडले आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात रोवणी ८० टक्केच्यावर झाली आहे. धानावर खोडकिडी व गादमाशीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
मागील चार दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळे खोडकिडी, गादमाशीला पोषक हवामान मिळाल्याने धान पीक संकटात आले आहे. अधूमधुन पावसाची रिपरिप सुरु असल्याने कीडनियंत्रक फवारणीला बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे जमिनीतून फर्टेरा, कार्टाप, फियुरीचा प्रयोग शेतकरी करतांना दिसत आहे. ही मात्रा महागडी होत आहे.
फवारणीतून स्वस्त व तत्काळ फायदा मिळू शकतो. फवारणीत क्लोरो व सायफरमेथ्रीन यांचे मिश्रण तर काही शेतकरी कार्बोहायड्रेड ५० टक्केचा मारा फवारणीतून करीत आहेत. तर काही शेतकरी या दोन्ही मात्रा एकत्रपणे मिश्रण करुन फवारणी करीत आहे.
१,०००-१,२०० रुपयापर्यंत ही फवारणी प्रति एकर खर्च येतो. कृषी विभागाने अनुदानावर वर्तमानातील किटकनाशके उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज दिला असतांना फक्त अत्यल्पच पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा बेत हुकला. नदी-नाले प्रवाहीत झाले खरे पण एक फुटाच्यावर पाणी नसल्याने पावसाळ्याप्रमाणे परिस्थिती नाही.
मंद हवा व रिपरिप पावसाने शिवार हिरवेगाव दिसत आहे. आरंभीची रोवणी पालवीला आले आहेत. परिसरात जोरदार पावसाची आस आहे. हलक्या धानाचे उत्पन्न कमी होणार असल्याचे वर्तविण्यात येत आहे. (वार्ताहर)